अग्निशमन दलातील कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:30 AM2020-12-05T04:30:54+5:302020-12-05T04:30:54+5:30
महापालिका क्षेत्र असाे वा जिल्ह्यात काेणत्याही ठिकाणी आगीची घटना घडल्यास मनपाचा अग्निशमन विभाग कायमच सज्ज राहताे आहे. स्वत:च्या जीवाची ...
महापालिका क्षेत्र असाे वा जिल्ह्यात काेणत्याही ठिकाणी आगीची घटना घडल्यास मनपाचा अग्निशमन विभाग कायमच सज्ज राहताे आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या विभागातील अधिकारी व कर्मचारी जीव धाेक्यात घालून आग विझविताना अनेकदा पाहावयास मिळतात. वर्तमान स्थितीत या विभागात आस्थापना, मानधन व कंत्राटी तत्वानुसार ६८ कर्मचारी कार्यरत आहेत. आग विझविण्यासाठी अनुभवी व चपळ कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते. या विभागातील आस्थापना व मानधनावरील सुमारे २८ पेक्षा अधिक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून वाढत्या वयाेमानानुसार त्यांना मर्यादा आल्या आहेत. या बाबीची प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. दुसरीकडे अग्निशमन विभागातील उपलब्ध साेयी-सुविधा अपुऱ्या पडत असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रशासनासह सत्ताधारी भाजपने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
आकृतीबंध सादर केलाच नाही!
मनपा क्षेत्राची झालेली हद्दवाढ लक्षात घेता अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी ठरत आहे. ही बाब लक्षात घेत मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी अग्निशमन विभागाला आकृतीबंधाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यावेळी प्रशासकीय सेवेचा आव आणनाऱ्या तत्कालीन अग्निशमन अधिकाऱ्यांना प्रशासनाकडे माहितीच सादर करता आली नाही, हे विशेष.
सबमर्सिबल पंपाला दुरुस्तीची प्रतीक्षा
मनपाच्या जलप्रदाय विभागामार्फत शहरातील असंख्य सबमर्सिबल पंप, हातपंप दुरुस्तीसाठी काेट्यवधी रुपयांचा खर्च केला जाताे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेत गणल्या जाणाऱ्या अग्निशमन विभागातील सबमर्सिबल पंप मागील तीन वर्षांपासून नादुरुस्त आहे, हे येथे उल्लेखनीय.
शहरातील अग्निशमन केंद्र
०१
अग्निशमन केंद्रातील कर्मचारी संख्या
६८
वाहनांची संख्या
०६ सुस्थितीत; ०२ नादुरुस्त
अग्निशमन विभागातील समस्या तातडीने निकाली काढल्या जातील. तशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या जाणार आहेत.
- संजय कापडणीस आयुक्त, मनपा