सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही फटाके; १० वाजतानंतरही फटाक्यांची आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:40 PM2018-11-09T14:40:43+5:302018-11-09T14:41:02+5:30
अकोला : देशातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हरित फटाक्यांचा वापर करावा तसेच दिवाळीच्या दिवशी रात्री ८ ते १० वाजतापर्यंत या दोन तासातच फटाके फोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही अकोल्यात रात्री १० वाजतानंतर फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाल्याचे दिसून आले
- सचिन राऊत
अकोला : देशातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हरित फटाक्यांचा वापर करावा तसेच दिवाळीच्या दिवशी रात्री ८ ते १० वाजतापर्यंत या दोन तासातच फटाके फोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही अकोल्यात रात्री १० वाजतानंतर फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाल्याचे दिसून आले. यावरून अकोलेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही ‘फटाके’ लावल्याचे चित्र बुधवारी शहरात होते.
फटाक्यांमधून निघणाऱ्या घातक धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या धुराच्या प्रदूषणाची तीव्रता भयंकर असल्याने प्रदूषणात दोन दिवसांतच झपाट्याने वाढ होते. त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून फटाके कमी प्रमाणात फोडण्याचे आवाहन करण्यासोबतच दिवाळीच्या रात्री ८ ते १० वाजतापर्यंतच फटाके फोडण्यास मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, तर हरित फटाके फोडण्यासाठी अधिक कालावधीची मुभा देण्यात आली होती; मात्र असे असतानाही अकोलेकरांनी दिवाळीच्या रात्री १० वाजतानंतरच फटाक्यांची जास्त प्रमाणात आतषबाजी केल्याचे ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या पाहणीत दिसून आले. आरोग्य विभागाची शासकीय वसाहत, पोलीस वसाहत व राजकीय पदाधिकाºयांच्या घरासमोरही रात्री उशिरा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याचेही या पाहणीत दिसून आले.
पाच जणांना समजपत्र
अकोल्यात रात्री १० वाजतानंतरही फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्यामुळे पोलिसांकडे काहींनी तक्रारी केल्या. यावरून सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी पाच जणांना ताब्यात घेतले. रात्री ठाण्यात ठेवल्यानंतर त्यांना समजपत्र देऊन सोडण्यात आले.
फटाक्यांची आतषबाजी कमीच!
शहरासह जिल्ह्यात दरवर्षी कोटींच्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते; मात्र यावर्षी जिल्ह्यात फटाक्यांची आतषबाजी कमी प्रमाणात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकच जागृत होत असून, सोबतच सर्वोच्च न्यायालयानेही फटाके फोडण्यासाठी कालावधी निश्चित केल्याने यावर्षी फटाक्यांची आतषबाजी दरवर्षीच्या तुलनेत कमीच झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईची दिशा स्पष्ट नाही!
दिवाळीच्या रात्री १० वाजतानंतर फटाके फोडण्यासाठी निर्बंध लादण्यात आले असले, तरी अकोल्यात मात्र या वेळेनंतरच अधिक फटाके फोडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने १० नंतर फटाके फोडणाºयांवर कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला; मात्र काय कारवाई करावी, हे स्पष्ट नसल्यामुळे पोलिसांनाही कारवाई करताना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पोलिसांनी समजपत्र देऊन सोडल्याची माहिती आहे.