निवासी इमारतीत फटाके विक्री, साठवणुकीस मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 06:13 PM2018-10-28T18:13:10+5:302018-10-28T18:14:07+5:30
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई असून संबंधित विक्रेत्यांनी नियमाचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई असून संबंधित विक्रेत्यांनी नियमाचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले.
शासन नियमानुसार फटाक्यांच्या दुकानांचे शेड हे आग प्रतिबंधक व पूर्णत: बंद असणे आवश्यक असून शेडमध्ये कोणताही अनोळखी व्यक्ती प्रवेश करणार नाही, अशी व्यवस्था दुकानदारांनी करावी. फटाक्यांच्या दोन दुकानातील अंतर हे कमीत कमी तीन मिटर व प्रोटेक्ट वर्कपासून ५० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या दुकानांची प्रवेशद्वारे एकमेकांसमोर नसतील याची दक्षता घ्यावी. दुकानामधील लाईटची व्यवस्था दुकानांच्या भिंतीवर सुरक्षितपणे करणे आवश्यक आहे. फटाक्यांची डिजिटल अॅडोटाईसची फलके दुकानांच्या ५० मीटर अंतरावर असावीत. एका ठिकाणी ५० पेक्षा जास्त दुकाने लावली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. एका फटाक्याच्या दुकानामध्ये जास्तीत जास्त १०० किलोग्रॅम फायर वर्क्स तथा ५०० किलोग्रॅम चायनीज, क्रेकर, स्पार्कलर्स स्फोटके ठेवली जातील, याची दक्षता घ्यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्दशानुसार फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेमध्ये, पटांगणामध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास कमीत कमी नुकसान होईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
रात्री ८ ते १० या वेळेच फटाके फोडावे
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फटाक्यांच्या दुकानामध्ये केवळ ग्रीन क्रेकर विकली जातील. नागरिकांनी दिवाळीच्या कालावधीमध्ये रात्री ८ ते १० वाजता दरम्यानच फटाके फोडावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.