मनपा विद्यार्थ्यांना देणार प्रथमोपचार पेटी; मुख्याध्यापकांना वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 02:29 PM2020-02-04T14:29:20+5:302020-02-04T14:29:28+5:30
सभापती मनीषा भन्साली यांनी मनपाच्या सर्व ३३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी देण्यासाठी पुढाकार घेतला.
अकोला : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती मनीषा भन्साली यांच्या कल्पकतेतून मनपा शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी प्रथमोपचार पेटीचे वितरण करण्यात आले. महापौर अर्चना मसने, सभापती मनीषा भन्साली यांच्या हस्ते शाळेतील सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांकडे सदर पेट्या हस्तांतरित करण्यात आल्या.
शाळांमधील चिमुकले विद्यार्थी म्हणजे थोड्याफार प्रमाणात दंगामस्ती, मैदानी खेळ ओघाने आलेच. अशा खेळण्या-बागडण्याच्या वयात थोडेफार खरचटणे, किरकोळ दुखापती होत राहतात. त्यावर वेळीच प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. ही बाब हेरत महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांनी मनपाच्या सर्व ३३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासंदर्भात प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. सोमवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात मनपाच्या ३३ शाळेतील मुख्याध्यापकांना प्रथमोपचार पेटीचे वितरण करण्यात आले. यावेळी महापौर अर्चना मसने, स्थायी समिती सभापती विनोद मापारी, महिला व बाल कल्याण समिती सभापती मनीषा भन्साली, महिला व बाल कल्याण समिती सदस्य अनुराधा नावकार, मंगला सोनोने मनपा उपायुक्त रंजना गगे, शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नंदिनी दामोदर यांनी, तर संचालन गजेंद्र ढवळे यांनी केले.