दुष्काळाच्या प्रथम झटक्यात अमरावती विभागातील ३२ तालुके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:45 PM2018-10-15T12:45:17+5:302018-10-15T12:45:38+5:30
अकोला: दुष्काळ ठरविण्याच्या निकषानुसार प्रथम कळ लागू होणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये अमरावती महसूल विभागातील ३२ तालुक्यांचा समावेश आहे.
- सदानंद सिरसाट
अकोला: दुष्काळ ठरविण्याच्या निकषानुसार प्रथम कळ लागू होणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये अमरावती महसूल विभागातील ३२ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये अकोल्यातील अकोट, पातूर तालुके वगळण्यात आले. उर्वरित पाच तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता मध्यम किंवा गंभीर असल्यास दुसरी कळ लागू होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
चालू वर्षातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, जलसाठे, पाणी पातळीची दृश्य स्थिती पाहता राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये प्रथम टप्प्यातील दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. दुष्काळाची प्रथम कळ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये विभागातील ३१ पैकी पाच अकोला जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये अकोला, बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने आॅक्टोबर २०१७ मध्ये दुष्काळ ठरविण्याचे निकष निश्चित केले आहेत. त्या निकषानुसार तीन टप्प्यातील तपासणी, विविध घटकांच्या अहवालावरून दुष्काळ जाहीर केला जातो. प्रत्येक टप्प्याच्या माहितीनुसारच दुसरा टप्पा निश्चित केला जातो. त्यामुळे दुष्काळाचा पहिला टप्पा म्हणजे ‘प्रथम कळ’ लागू झाली तरी दुष्काळ जाहर होईल, याची कोणतीच शाश्वती नाही. अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यातील इतर घटकांसंदर्भात अहवाल जिल्हास्तरीय समिती देणार आहे.
जिल्हास्तरीय समिती ठरविणार दुष्काळाची तीव्रता!
जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सचिव म्हणून आहेत. इतर अधिकाºयांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, महाराष्ट्र रिमोट सेंसिंग अॅप्लिकेशन सेंटर नागपूर येथील तज्ज्ञ व्यक्ती, निवासी उपजिल्हाधिकारी, निमंत्रित सदस्य जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता ठरविणार आहेत. दुष्काळ मध्यम किंवा गंभीर ठरविला जाणार आहे.
५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असल्यास दुष्काळ
ज्या तालुक्यातील पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तेथेच दुष्काळाची तीव्रता गंभीर समजली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील पीक परिस्थितीचा अहवाल घेणे आवश्यक आहे.
निर्देशांकानुसार ठरेल दुष्काळ!
वनस्पतीशी संबंधित निर्देशांकामध्ये पीक परिस्थितीचा विचार केला जाणार आहे. सोबतच पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक आर्द्रता निर्देशांक, भूजल पातळी निर्देशांक या सर्व घटकांची तालुकानिहाय आकडेवारी गृहीत धरून दुष्काळ किती प्रभावी आहे, याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या अहवालावरून घेतला जाणार आहे. सद्यस्थितीत पर्जन्यमानात तूट असणे या निकषावर दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू झाली आहे; मात्र तीव्र किंवा गंभीर दुष्काळ जाहीर होईलच, याची कोणतीही शाश्वती नसल्याचे या निकषावरून स्पष्ट होत आहे.