विदर्भात बनतेय पहिले कास्टिंग हब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 02:34 AM2016-11-16T02:34:52+5:302016-11-16T02:34:52+5:30
अकोल्यातील युवक साकारतोय नागपुरात कास्टिंग हब.
नितीन गव्हाळे
अकोला, दि. १५- प्रत्येकामध्येच एक अभिनय कला दडलेली असते आणि आपणही नाट्यक्षेत्र, जाहिरात, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करून करियर करावे, नाव कमवावे, असे प्रत्येकाला वाटते; परंतु ते शक्य होत नाही. अनेकांमध्ये अभिजात अभिनयाचे कलागुण लपलेले असतात; परंतु त्यांना योग्य व्यासपीठ किंवा दिशा मिळत नाही; परंतु अभिनयाची आवड असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींपासून ते तरुण-तरुणींपर्यंंत सर्वांंनाच कास्टिंग हब माध्यमातून उत्तम संधी चालून येत आहे. अकोल्यातील क्रिष्णा आसरकर नामक युवकाने नागपुरात विदर्भात पहिले कास्टिंग हब साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
विदर्भातील लहान मुले, तरुण, तरुणींमध्ये अभिनय, नृत्य हे कलागुण आहेत; परंतु त्यांना संधी मिळत नाही. ऑडिशन कशा द्याव्यात, कुणाशी कसा संपर्ककरावा, याची माहिती नाही. त्यामुळे विदर्भातील मुले-मुली मुंबई, पुण्याकडे जात नाहीत. अकोल्यातील रामदासपेठेत राहणारे क्रिष्णा आसरकर हे व्यवसायानिमित्त नागपूरला स्थायिक झाले. त्यांची मुलगी समृद्धी(६) हिला अभिजात अभिनय, नृत्याची आवड असल्याने, क्रिष्णा आसरकर यांनी मुलीला मुंबई, पुणे येथे ऑडिशन दिल्या. त्यांच्या मुलीमधील अभिनय, नृत्यकला पाहून तिची टीव्हीवरील मालिका, जाहिरातीसाठी निवड झाली. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतसुद्धा समृद्धीला काम करण्याची संधी मिळाली. एवढेच नाही तर डान्स टु शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले. यावेळी क्रिष्णा आसरकर यांना आलेल्या अडचणी आणि विशेषत: विदर्भातील मुले-मुली ऑडिशनमध्ये कुठेच दिसत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये विदर्भातील ५ ते १0 वयोगटातील मुले-मुली, १५ ते २0 वयोगटातील तरुण-तरुणींसाठी कास्टिंग हब सुरू करण्याचा विचार आला आणि त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. नागपुरात क्रिष्णा आसरकर हे समृद्धी कास्टिंग हब साकारत आहेत. त्यांच्या कास्टिंग हबच्या माध्यमातून विदर्भातील चिमुकल्या मुले-मुली, तरुण-तरुणींना सिरियल्स, मुव्हीज, प्रिंट शूट, डान्स शो आदींमध्ये स्वत:ची अभिनय क्षमता, नृत्य कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
कलागुणांना मिळेल वाव
क्रिष्णा आसरकर यांची मुलगी समृद्धीने वयाच्या तिसर्या वर्षापासूनच टीव्ही मालिका, डान्स शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली. क्रिष्णा आसरकर यांना नेहमीच मुंबई, पुणे, ठाणे येथे ऑडिशन देण्यासाठी जावे लागते. यानिमित्ताने त्यांची चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शकांसोबत ओळख झाली. याचा फायदा विदर्भातील मुला-मुलींना व्हावा, यासाठीच त्यांनी कास्टिंग हब सुरू करण्याचा चंग बांधला. अभिनय, नृत्याची आवड असलेली मुले-मुली, त्यांच्या पालकांना मुंबईला नेवून क्रिष्णा आसरकर हे ऑडिशन घेतील, तसेच यूट्युब लिंक बनवून या मुला-मुलींची कला ते संबंधित कंपनीला पाठवतील.