पहिल्या दिवशी ५० प्रवाशांनी घेतला डेमू गाडीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 10:40 AM2021-07-20T10:40:08+5:302021-07-20T10:40:18+5:30
Akola-Purna Demu : पहिल्या दिवशी या गाडीने अकोला स्थानकावरून ५० प्रवाशांनी प्रवास केला.
अकोला : दीर्घ प्रतीक्षेनंतर दक्षिण-मध्य रेल्वेकडून पूर्णा ते अकोला डेमू गाडी सुरू करण्यात आली असून, सोमवार, १९ जुलै रोजी पहिली डेमू गाडी सकाळी ११.४५ वाजता अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचली. दुपारी चार वाजता ही गाडी पूर्णाकरिता रवाना झाली. पहिल्या दिवशी या गाडीने अकोला स्थानकावरून ५० प्रवाशांनी प्रवास केला.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने दक्षिण-मध्य रेल्वेने अनेक गाड्या पूर्ववत केल्या आहेत. वाशिममार्गे जाणाऱ्या या मार्गावर पूर्वी अकोला-पूर्णा, अकोला-परळी या पॅसेंजर गाड्या धावत होत्या. नांदेड विभाग व्यवस्थापकांनी या मार्गावर डेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. याचाच एक भाग म्हणून नांदेड विभागांतर्गत पूर्णा ते अकोला डेमू गाडी सुरू करण्यात आली आहे. सोमवार, १९ जुलै रोजी पहिली डेमू गाडी ०७७७३ पूर्णा येथून प्रस्थान केले व सकाळी ११.४५ वाजता ही गाडी अकोला रेल्वेस्थानकावरील प्लॅटफाॅर्म क्र. ६ वर आली. यावेळी डेमू गाडी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. दुपारी चार वाजता ०७७७४ ही अकोला ते पूर्णा गाडी पूर्णाकरिता रवाना झाली. या गाडीसाठी एकूण ३३ तिकिटांची विक्री झाली, याद्वारे रेल्वेला १,८७५ रुपयांची कमाई झाली.
अकोट तालुक्यातील नागरिकांचा हिरमोड
अकोला ते अकोट ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन झाल्यानंतर या मार्गावर प्रवासी गाड्या सुरू करण्याची मागणी अकोट तालुक्यातील नागरिकांनी लावून धरली आहे. पूर्णा ते अकोट डेमू गाडीचा प्रस्तावही देण्यात आला होता. त्यामुळे अकोटकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तथापि, ही गाडी केवळ अकोलापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. त्यामुळे अकोट तालुक्यातील नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
नव्याने सुरू झालेल्या डेमू गाडीचा विस्तार अकोटपर्यंत होईल, अशी अपेक्षा अकोट तालुक्यातील नागरिकांना आहे.