संचारबंदीचा पहिला दिवस पोलिसांसाठी ठरला डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:18 AM2021-04-16T04:18:08+5:302021-04-16T04:18:08+5:30
तेल्हारा : शासनाने अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरू ठेवून संचारबंदी जाहीर केली मात्र जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचा ...
तेल्हारा : शासनाने अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरू ठेवून संचारबंदी जाहीर केली मात्र जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचा नागरिक व व्यावसायिकांनी त्याचा गैरफायदा घेतल्याने काेराेना प्रतिबंधासाठीचे कडक निर्बंध पोलीस व प्रशासन करीता डोकेदुखी ठरल्याचे चित्र पहिल्या दिवशी तेल्हारा शहरात पहावयास मिळाले.
शहरात सकाळपासून नागरिकांची ये-जा सुरू असल्याने वाहनांची वर्दळ पहावयास मिळाली. पोलिसांनी अनेकदा जिल्ह्यत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी त्याचे उल्लंघन करू नये, असे जाहीर आवाहन केले हाेते. तरी नागरिक काही ऐकत नसल्याने दिसून आले. स्वतः पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे त्यांचा ताफा घेऊन रस्त्यावर उतरले. दरम्यान, शहरातील काही व्यावसायिकांनी दुकान जरी बंद असले तरी दुकानासमोर उभे राहून दुकानदारी करीत होते. काही उत्साही नागरिक हे नेहमीच्या सवयीप्रमाणे चौकात गप्पा मारत उभे होते. हॉटेल्स व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन करीत आपली दुकानदारी सुरू केली होती. फळविक्रेते यांनी जिथे जागा दिसेल तिथे दुकानदारी सुरू केली होती. त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक दिसत होते, मात्र त्यानंतर ठाणेदार नितीन देशमुख यांनी नगरपरिषद प्रशासनाला सोबत घेऊन चौकातील गर्दी कमी केली. हॉटेल व्यावसायिकांना नियम सांगितले. सर्व फळविक्रेते यांना शिवाजी हायस्कूल येथे एका ठिकाणी पर्यायी जागा दिली. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांची चौकशी सुरू केली. काही प्रमाणात गर्दी व रहदारीला आळा बसला, मात्र नागरिकांनी गर्दी केल्याने पोलिसांकरिता संचारबंदी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून आले.
--------------
किरकोळ विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर
अत्यावश्यक व जीवनावश्यकमध्ये येणारी दुकाने ही किरकोळ विक्रेते यांच्यापेक्षा मोठ्या व्यावसायिक व व्यापारी वर्गाची असून, त्यांना संचारबंदीमध्ये सूट देऊन दिवसभर दुकान सुरू ठेवण्याची त्यांना मुभा देण्यात आली. ज्यांचे ‘कमवा अन् खा’ असे किरकोळ विक्रेते यांच्या व्यवसायावर बंदी असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.