पहिल्या दिवशी सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन, उडिदाचा दाणाही नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:31 PM2019-11-09T12:31:43+5:302019-11-09T12:31:49+5:30
पहिल्या दिवशी (शुक्रवारी) जिल्ह्यातील सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन व उडिदाचा दाणाही खरेदी करण्यात आला नाही.
अकोला : सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर शुक्रवार, ८ नोव्हेंबरपासून हमीदराने उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली; मात्र खरेदीच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सातही केंद्रांवर सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकही शेतकरी आला नाही. शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने खरेदीच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) जिल्ह्यातील सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन व उडिदाचा दाणाही खरेदी करण्यात आला नाही.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा, पातूर, वाडेगाव, पारस व मूर्तिजापूर इत्यादी सात खरेदी केंद्रांवर उडीद व सोयाबीनची हमीदराने खरेदी सुरू करण्यात आली. आॅनलाइन नोंदणी केलेल्या व एसएमएस पाठविण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि उडीद संबंधित केंद्रांवर खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये अकोला, अकोट व मूर्तिजापूर या तीन केंद्रांवर विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत आणि तेल्हारा, पातूर, पारस व वाडेगाव या चार केंद्रांवर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली. ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर हमीदराने सोयाबीन व उडिदाची खरेदी सुरू करण्यात आली; मात्र खरेदीच्या पहिल्या दिवशी सातही केंद्रांवर एकाही शेतकºयाने सोयाबीन व उडीद विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर आणला नाही. त्यामुळे खरेदीच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन व उडिदाचा दाणाही खरेदी करण्यात आला नाही.
सोयाबीन, उडिदाचे असे आहेत हमीदर व बाजारातील दर!
‘नाफेड’मार्फत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन प्रतिक्विंटल ३ हजार ७१० रुपये व उडीद प्रतिक्विंटल ५ हजार ७०० रुपये हमीदराने खरेदी करण्यात येत आहे. बाजारात सोयाबीन प्रतिक्विंटल १ हजार ८०० ते ३ हजार ७०० रुपये आणि उडीद प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार ५०० रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे.
३२२ शेतकºयांना ‘एसएमएस’; पण केंद्रांवर आणला नाही शेतमाल!
हमीदराने उडीद व सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यातील सातही खरेदी केंद्रांवर दोन हजार शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी १ हजार २५१ शेतकºयांनी आणि उडीद खरेदीसाठी ७४९ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १५७ सोयाबीन उत्पादक शेतकºयांना व १६५ उडीद उत्पादक शेतकºयांना शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणण्याचे ‘एसएमएस’ ७ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्यात आले. ‘एसएमएस’ पाठविण्यात आलेल्या एकाही शेतकºयाने खरेदीच्या पहिल्या दिवशी खरेदी केंद्रांवर शेतमाल आणला नाही.
खरेदी केंद्रांवर शुकशुकाट!
जिल्ह्यात हमीदराने उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नाफेडमार्फत सात खरेदी केंदे्र सुरू करण्यात आली; परंतु खरेदीच्या पहिल्या दिवशी एकाही केंद्रावर शेतकºयांना सोयाबीन व उडीद विक्रीसाठी आणला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सातही खरेदी केंद्रांवर शुकशुकाट दिसत होता.
सोयाबीन भिजले-सडले; विक्रीसाठी आणणार कोठून?
यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यात मूग, उडिदाचे पीक बुडाले. त्यानंतर गत महिनाभरापासून अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याने अवकाळी पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन भिजले असून, अनेक शेतात सोयाबीन सडले आहे. त्यामुळे शेतकरी हमीदराच्या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी आणणार तरी कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.