आठवड्याचा पहिला दिवस आंदोलनाचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:20 AM2021-07-27T04:20:00+5:302021-07-27T04:20:00+5:30
‘एसटी’ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू! आंतर विभागातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागात तातडीने रुजू ...
‘एसटी’ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू!
आंतर विभागातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागात तातडीने रुजू करून घेण्यात यावे, या मागणीसाठी ‘एसटी’च्या आठ वाहक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या आंतर विभागातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अकोला विभागात रुजू करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने ‘एसटी’च्या संबंधित कर्मचाऱ्यांवर गेल्या सहा महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अकोला विभागात तातडीने रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी उल्हास खराटे, बोकुळदास जाधव, गोपाल बोंडे, नंदू कांबळे, विवेक इंगळे, दुर्गादास राऊत, प्रमोद लोणे आदी वाहक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागणीची पूर्तता होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविला.
......................फोटो............................
मूलनिवासी बहुजन कर्मचारी
संघाने केली निदर्शने !
’आरक्षण बचाओ, लोकतंत्र बचाओ’ आंदोलन अंतर्गत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अकोला जिल्हा शाखेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाला विरोध करीत तसेच शिक्षण व नोकरीतील आरक्षणविरोधी धोरण, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचे धोरण, शेतकरीविरोधी कायदे लागू करण्याचे धोरण, मराठा समाजाला आरक्षण लागू न करण्याच्या धोरणांविराेधात मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. यावेळी मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत इंगळे, सारंग निखाडे, राजेंद्र इंगोले, वैशाली इंगोले, बाळासाहेब खंडारे, आकाश चापके, राहुल इंगळे आदी उपस्थित होते.
..................फोटो......................