पहिल्या सोडतीत एक किमीच्या आतील विद्यार्थ्यांना प्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:57 AM2018-03-14T01:57:55+5:302018-03-14T01:57:55+5:30

In the first draw one-in-one students enter the entrance! | पहिल्या सोडतीत एक किमीच्या आतील विद्यार्थ्यांना प्रवेश!

पहिल्या सोडतीत एक किमीच्या आतील विद्यार्थ्यांना प्रवेश!

Next
ठळक मुद्दे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आजपासून प्रवेश, सोडतीला पालकांची गर्दी


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेश प्रकियेसाठी ४ हजार ८३0 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर मंगळवारी सकाळी जि.प. आगरकर शाळेच्या सभागृहात २५ टक्के प्रवेशांतर्गत इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने पहिली सोडत काढण्यात आली. बालकांच्या हातून चिठ्ठ्या काढून प्राप्त झालेल्या नोंदणी क्रमांक आॅनलाइन सादर करण्यात आले. सुरुवातीला शाळेपासून एक किमी अंतरावर निवासस्थान असलेल्या पालकांना प्राधान्य देण्यात आले. 
प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित घटकांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती, धर्मातील दिव्यांग मुले, तसेच दुर्बल घटकांतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असणारे, खुल्या प्रवर्गासह विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी विलास धनाडे, संध्या कांगटे, शिक्षण विस्तार अधिकारी विनोद मानकर, साजिया नौशीन, अरविंद जाधव, जिल्हा प्रोग्रामर सुशील दुतोंडे यांच्या उपस्थितीत २५ टक्के प्रवेशासाठी सोडत काढण्यात आली. पहिल्या टप्प्यात शाळेपासून एक किमी अंतरावर राहत असलेल्या विद्यार्थ्यांचे नोंदणी क्रमांक पालकांच्या समक्ष काढून आॅनलाइन पद्धतीने एनआयसी पुणे येथे पाठविण्यात आले. त्यामुळे बुधवारी पालकांना पुणे येथून मोबाइलवर शाळांची नावे पाठवून प्रवेशासंबंधीचे संदेश देण्यात येतील. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ५0 ते ६0 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश निश्चित करता येतील, त्यानंतर शाळेपासून २ व ३ किमी अंतरावर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे. शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, सोडत-लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जातील. शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आल्यास, आलेल्या अर्जांपैकी पात्र अर्जदाराचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. पात्र पालकांना मोबाइलवर संदेश प्राप्त होतील. 

निवड झाल्यास प्रवेश कसा घ्यावा?
दिलेल्या ठरावीक मुदतीत प्रवेश मिळालेल्या संबंधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, सोबत कागदपत्रांच्या मूळ प्रती व झेरॉक्स घेऊन जाव्यात, शाळा मूळ कागदपत्र पाहून प्रवेश निश्चित करेल. प्रवेश प्रक्रियेंतर्गत शाळेत प्रवेश निश्चित विद्यार्थ्यांना प्रवेश न घेतल्यास, त्याला पुढील लॉटरीमध्ये सहभागी होणार येणार नाही. आरटीई २५ टक्के प्रवेश प्राप्त झाल्यास, संबंधित शाळा मुलांना प्रवेश दिल्याची पावती देईल आणि प्रवेश दिला नाही, तर त्याचीही कारणासह पावती देईल.

पुणे येथून मिळालेल्या वेळापत्रकानुसारच इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया होईल. वेळापत्रकात काही बदल झाल्यास पालकांना सूचित करण्यात येईल. 
- प्रशांत दिग्रसकर, 
शिक्षणाधिकारी.

 

Web Title: In the first draw one-in-one students enter the entrance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला