‘गॉडफादर’शिवाय पहिलीच निवडणूक!
By admin | Published: September 17, 2014 02:27 AM2014-09-17T02:27:26+5:302014-09-17T02:27:26+5:30
इच्छुकांची फरपट: उमेदवारांना भासणार दिवंगत नेत्यांची उणीव.
अजय डांग/ अकोला
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यासारख्या दिग्गज नेत्यांच्या पश्चात होणारी विधानसभेची यावेळची पहिलीच निवडणूक. या दिवंगत लोकनेत्यांची आपआपल्या पक्षात सर्मथकांची फौज आहे. या लोकनेत्यांची उणीव त्या-त्या पक्षाला ज्याप्रमाणे भासत आहे, त्याचप्रमाणे उमेदवारीसाठी झगडणार्या इच्छुकांनाही भासत आहे.
बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यासारखे महाराष्ट्रातील लोकनेते गत वर्ष-दोन वर्षात काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या हयातीत राजकीय उंची गाठलेल्या या लोकनेत्यांना मानणारी सर्मथकांची फौज अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आहे. पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार्या या लोकनेत्यांना महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. भाजप नेते गोपीना थ मुंडे पक्षावर नाराज असताना, त्यांच्या सर्मथनार्थ महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे किंवा सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेवर पेटून उठणारे शिवसैनिक ही त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती होती. अशा या लोकनेत्यांची उणीव त्या-त्या पक्षांना पदोपदी भासत आहे. या सर्वमान्य नेत्यांच्या पश्चात खरी फरपट होत आहे ती उमेदवारांची. निवडणूक आली की, पक्षाशी संबंध नसलेले कार्यकर्ते एका रात्रीतून नेते होतात आणि उमेदवारीसाठी पक्षनेत्यांकडे मोर्चेबांधणी करतात. पक्षासाठी अहोरात्र झटलेल्या कार्यकर्त्यांवर मात्र अनेकदा अन्याय होतो. अशा अनेक कार्यकर्त्यांच्या पदरी त्यांच्या गॉडफादरच्या पश्चात निराशा आल्याचे पाहावयास मिळत आहे. गटातटाचे राजकारण प्रत्येक पक्षात फोफावले आहे. या राजकारणाचा बळी हे प्रामाणिक कार्यकर्ते ठरत आहेत. महाराष्ट्राची नाडी ठाऊक असलेल्या या लोकनेत्यांच्या पश्चात पक्ष थांबला नाही, कुणी तरी त्यांची धुरा सांभाळलीच; पण त्यांना साहेबांची सर येत नाही असे अनेक जुणे-जाणते कार्यकर्ते खिन्न मनाने बोलून दाखवतात.