सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात एक लाखापेक्षा जास्त लोक झाले लसवंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:19+5:302021-09-19T04:20:19+5:30
अकोला : सप्टेंबर महिन्यात दोन लाख लोकांना पहिला व दुसरा डोस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. त्या अनुषंगाने ...
अकोला : सप्टेंबर महिन्यात दोन लाख लोकांना पहिला व दुसरा डोस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. त्या अनुषंगाने लसीकरण मोहिमेची वाटचाल सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच एक लाख ११ हजार ६७५ लोकांचे लसीकरण झाले. यामध्ये पहिला डोस घेणारे ७८ हजार ६९ नागरिकांचा समावेश असून, ३३ हजार ६०६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता, आरोग्य विभागातर्फे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्यात २ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या दिशेनेे वाटचाल करत, आरोग्य विभागाने १७ सप्टेंबरपर्यंत एक लाख ११ हजार ६७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाची हीच गती राहिल्यास दिवाळीपर्यंत सुमारे ९० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला असेल, तर ५० टक्के लोकांनी दुसरा डाेस घेतलेला असेल. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात मुबलक लसींचा साठा उपलब्ध असल्याने येत्या काळात लसीचा तुटवडाही जाणवणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.
लसीचे ४४ हजार डोस प्राप्त
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात सुरू असताना, जिल्ह्याला शुक्रवारी लसीचे ४४ हजार ४४० डोस प्राप्त झाले. यामध्ये प्रामुख्याने कोविशिल्डचे ३९ हजार, तर कोव्हॅक्सिनच्या ५ हजार ४४० डोसचा समावेश आहे.
लसीचा अपव्यय नाहीच
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात लसीचा अपव्यय होण्याचे प्रमाण ‘नाही’च्या बरोबर आहे. विशेष म्हणजे, एका व्हायलमध्ये दहाऐवजी अकरा जणांना लस दिली जात असल्याने, लसीची मोठी बचत होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. कमी लसीमध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होत असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्याची स्थिती चांगली आहे.
सप्टेंबर महिन्यात दोन लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी पुढाकार घेऊन लस घ्यावी. विशेषत: दुसऱ्या डोस साठीचा कालावधी पूर्ण केला, अशांनी प्राधान्याने लस घ्यावी.
- डॉ.मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला.