आधी प्रेम नंतर शोषण करुन आर्थिक फसवणूक
By आशीष गावंडे | Published: April 19, 2024 11:04 PM2024-04-19T23:04:47+5:302024-04-19T23:05:01+5:30
महिलेच्या तक्रारीवरुन सिव्हील लाइन पोलिसात गुन्हा
अकाेला: पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर विश्वास ठेवत प्रेयसी नवऱ्याला साेडचिठ्ठी देत माहेरी परत आली. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेयसी महिलेचा गैरफायदा घेत प्रियकराने तीच्याकडून लाखाे रुपये उकळले. आपले शारिरिक शाेषण करुन आर्थिक फसवणूक केल्याची बाब प्रेयसी महिलेच्या लक्षात आल्यानंतर तीने सिव्हील लाइन पाेलिस ठाण्यात धाव घेत प्रियकराविराेधात तक्रार नाेंदवली असून पाेलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
किशोर श्रीराम सदांशिव (४५)रा.शिक्षक कॉलनी, मोठी उमरी असे गुन्हा दाखल केलेल्या आराेपीचे नाव आहे. ३८ वर्षीय फिर्यादी सुनिता (काल्पनिक नाव) हिचे किशाेर सदांशिव साेबत सन १९९५ पासून ओळख व प्रेम संबंध होते. सन २००४ नंतर फिर्यादी ही तिच्या पतीला सोडून आई वडिलांकडे राहायली आली. त्यावेळी किशाेरने तुझी फारकती झाली असून आपण लग्न करू व आयुष्यभर साेबत राहू,असे आश्वासन देत वेळाेवेळी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्या घरी जाऊन तसेच शेगाव येथे नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. प्रदिर्घ कालावधीनंतर सन २०२१ पासून आरोपीने महिलेसाेबत असलेले प्रेम संबंध तोडले, तेव्हा फिर्यादी महिलेने त्यास दिलेले पैसे परत मागितले. परंतु उडवाउडवीची उत्तरे देऊन आराेपी वेळ निभावून नेत असल्यामुळे आपले शारिरिक शाेषण करुन व आर्थिक फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या ध्यानात आली. पैशांची मागणी केली असता, आराेपीने दोन वेळा जीवाने मारण्याचा प्रयत्न केला. यापुढे पैसे मागितल्यास जीवाने ठार करील अशी धमकी दिल्याची तक्रार फिर्यादी महिलेने सिव्हील लाइन पाेलिस ठाण्यात केली. प्राप्त तक्रारीनुसार पाेलिसांनी किशोर श्रीराम सदांशिव (४५)रा.शिक्षक कॉलनी, मोठी उमरी याच्या विराेधात भादंविच्या कलम ३७६, ३७६(२)(एन),३०७,४१७,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
साडेसहा लाख रुपये उकळले
सन १९९५ पासून प्रेम संबंध असलेल्या आरोपीने फिर्यादी महिलेकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. प्रियकरावर विश्वास असल्यामुळे फिर्यादीने आरोपी किशाेर याला काही राेख रक्कम दिली तसेच बँकेतून ट्रान्सफर करून सहा लाख ५० हजार रुपये दिले हाेते. प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर पैसे परत मागितले असता, महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमुद आहे.