कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा १४ फेब्रुवारीला संपण्याचे संकेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:46+5:302021-02-07T04:17:46+5:30
कोरोना काळात रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ९ ...
कोरोना काळात रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ९ हजार ९५७ लाभार्थींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले होते. त्यापैकी ५ हजार १३२ लाभार्थींना आतापर्यंत लस देण्यात आली. उर्वरित ४ हजार ८२५ लाभार्थींना येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत लस देणे अपेक्षित आहे. उपक्रमांतर्गत पहिल्या लाभार्थीला लस घेऊन २८ दिवस पूर्ण होणार असून, १४ फेब्रुवारीनंतर त्याला लसीचा दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत तयारी केली जात आहे.
‘त्या’ लाभार्थींना लस घेण्याची पुन्हा संधी
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ज्या लाभार्थींना लसीकरणाचा संदेश येऊनही लस घेता आली नाही, अशा लाभार्थींना लस घेण्याची पुन्हा एक संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ग्रामीण भागातील अशा लाभार्थींसाठी सोमवारपासून विशेष फेरी राबविण्यात येणार असून, महापालिका कार्यक्षेत्रात लवकरच लसीकरणाची विशेष फेरी राबविली जाणार असल्याची माहिती आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जात आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण १४ फेब्रुवारीपर्यंत संपविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. तसेच लवकरच लाभार्थींना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. यादरम्यान पहिल्या टप्प्यात ज्यांना लस घेता आली नाही, अशा लाभार्थींसाठी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला