आधी रस्ते दुरुस्ती, त्यानंतर जलवाहिनीचे जाळे टाका - जितेंद्र वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:45 AM2018-05-06T01:45:56+5:302018-05-06T01:45:56+5:30
अकोला: शहरात मुख्य रस्त्यांलगत खोदकाम करून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असले तरी रस्त्यांच्या दुरुस्तीला विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आतापर्यंत खोदकाम केलेल्या रस्त्यांची आधी दुरुस्ती करा, त्यानंतरच टप्प्याटप्प्याने जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे निर्देश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कंत्राटदाराला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरात मुख्य रस्त्यांलगत खोदकाम करून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असले तरी रस्त्यांच्या दुरुस्तीला विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आतापर्यंत खोदकाम केलेल्या रस्त्यांची आधी दुरुस्ती करा, त्यानंतरच टप्प्याटप्प्याने जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे निर्देश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कंत्राटदाराला दिले.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’योजनेच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना व संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही कामांवर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. या दोन्ही योजनांचा आवाका पाहता त्यावर देखरेख ठेवणाºया मजीप्राची प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. शहरात पहिल्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाने ११० कोटी मंजूर केले. त्यापैकी ८७ कोटींची निविदा प्रकाशित करण्यात आली होती.
जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा कंत्राट ‘एपी अॅन्ड जीपी’ कंपनीला देण्यात आला आहे. शहरात ९७ किलोमीटर अंतराचे जाळे टाकताना कंत्राटदाराने मुख्य रस्ते व रस्त्यालगतचा भाग खोदून जलवाहिनी टाकली आहे. खोदकाम केलेल्या मुख्य रस्त्यांची तीन-तीन महिन्यांपासून दुरुस्ती केली जात नसल्याचे चित्र असून, यासंदर्भात भाजपाचे नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी मनपा प्रशासनाला रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे. त्यानुषंगाने महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी जलप्रदाय विभाग तसेच ‘एपी अॅन्ड जीपी’ कंपनीच्या कंत्राटदाराकडून कामकाजाचा आढावा घेतला. रस्त्याचे खोदकाम करून जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्याची अवघ्या दहा ते बारा दिवसांत दुरुस्ती करणे तांत्रिकदृष्ट्या अपेक्षित नसले तरी मागील तीन महिन्यांपासून शहरातील मुख्य रस्ते, मुख्य चौकातील दुरुस्तीला का विलंब झाला, असा सवाल उपस्थित करीत मनपा आयुक्त वाघ यांनी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागासह कंत्राटदाराला दिले आहेत.
टप्प्याटप्प्याने रस्ते दुरुस्ती करा!
महान धरण ते अकोला शहरापर्यंत १४७ किलोमीटर आणि शहरातील अंतर्गत भागात २६५ किलोमीटर अंतराची नवीन जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. आजरोजी शहरात जलवाहिनीचे सुमारे ९७ किलोमीटरचे जाळे टाकण्यात आले आहे. पुढील टप्प्याला सुरुवात करण्यापूर्वी कंत्राटदाराने आधी खोदकाम के लेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी, त्यानंतर पुढील कामाला सुरुवात करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
मजीप्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
हद्दवाढीचा भाग वगळता संपूर्ण शहरात जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. प्रभागातील अंतर्गत कामाचा दर्जा योग्यरीत्या नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. या कामासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मजीप्राची क्षमता पाहता त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. असे असले तरी सत्ताधारी भाजपासह चक्क विरोधी पक्ष काँग्रेसने साधलेल्या चुप्पीमुळे अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.