पहिल्या फेरीतील प्रवेशास सोमवारपर्यंत मुदतवाढ!
By admin | Published: July 15, 2017 01:33 AM2017-07-15T01:33:37+5:302017-07-15T01:33:37+5:30
केंद्रीय समितीचा निर्णय : अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केंद्रीय पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, १४ जुलै रोजी प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख होती; परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नसल्यामुळे तसेच पालकांच्या विनंतीवरून विद्यार्थ्यांच्या हितासाठी पहिल्या फेरीतील प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता सोमवार, १७ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. केंद्रीय प्रवेश समितीच्या डॉ. सुभाष भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ४,0६३ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार मंगळवारपासून कनिष्ठ महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार दिलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
यादीमध्ये दिलेल्या पसंतीक्रमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने प्रवेश प्रक्रिया समितीने विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालये उपलब्ध करून दिली आहेत; परंतु काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमता आणि गुणवत्तेनुसार जागा उपलब्ध केल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांचा हिरमोड झाला असून, त्यांनी शुक्रवारपर्यंत प्रवेश निश्चित केला नव्हता. यामुळे केंद्रीय प्रवेश समितीने शुक्रवारी सायंकाळी तातडीची बैठक बोलावून प्रवेश प्रक्रियेला सोमवार, १७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. कनिष्ठ महाविद्यालयांनी १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा.
तसेच व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशही याच दिवशी निश्चित करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी मंगळवार, १८ जुलैपर्यंत त्यांच्याकडे झालेल्या प्रवेशांची माहिती आर.एल.टी. महाविद्यालय येथे सकाळी ११ वाजता सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या फेरीकरिता बदल
दुसऱ्या फेरीकरिता प्रवेश अर्ज स्वीकारण्याच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. आता विद्यार्थी दुसऱ्या फेरीकरिता सोमवार, १७ जुलै दुपारी ३ ते ५ या वेळेपर्यंत अर्ज सादर करू शकतात. दुसऱ्या फेरीची प्रवेश यादी २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता आर.एल.टी. महाविद्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र विद्यार्थ्यांना २० ते २२ जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे.