पहिले राज्यस्तरीय होमिओपॅथी सचित्र प्रदर्शन अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:19 PM2018-04-13T13:19:05+5:302018-04-13T13:19:05+5:30
अकोला : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त सर्वसामान्य रुग्णांना या उपचार पद्धतीची ओळख होऊन भारतीय जीवन व्यापून टाकलेल्या पॅथीला समजून घेण्यासाठी पहिले राज्यस्तरीय होमिओपॅथी सचित्र प्रदर्शन रविवार, १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. सितल टोंगसे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
अकोला : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त सर्वसामान्य रुग्णांना या उपचार पद्धतीची ओळख होऊन भारतीय जीवन व्यापून टाकलेल्या पॅथीला समजून घेण्यासाठी पहिले राज्यस्तरीय होमिओपॅथी सचित्र प्रदर्शन रविवार, १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. सितल टोंगसे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
होमिओपॅथी ही जगातील सर्वात अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञान असलेली वैद्यकीय चिकित्सा प्रणाली आहे. होमिओपॅथीचा अनेक देशांमध्ये उपयोग केल्या जात आहे. जगात ५० कोटींवर लोकांना या पॅथीचा लाभ झालेला आहे. होमिओपॅथीमुळे फक्त शरीरच नाही, तर रुग्णांचे मन आणि विचारसुद्धा निरोगी होतात. कॅन्सर, मधुमेह, थायरॉइड, किडनीचे आजार आदींवर होमिओपॅथी परिणामकारक आहे. अकोल्यातही या अद्ययावत चिकित्सा प्रणालीची ओळख व्हावी म्हणून ओळख होमिओपॅथीची या नावाने प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. हे सचित्र प्रदर्शन महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयोजित केले असल्याचे डॉ. टोंगसे यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे रविवारी सकाळी ९.३० वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर विजय अग्रवाल, नगरसेविका सुनीता अग्रवाल, नगरसेवक, आशिष पवित्रकार उपस्थित राहणार आहेत. जागतिक कीर्तीचे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. बंदिश अंबानी (मुंबई) हे प्रमुख वक्ते, तर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर मालोकार, प्राचार्य डॉ. संजय तिवारी प्रभात किड्स स्कूलचे प्रमुख डॉ. गजानन नारे, सन्मित्र पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रदीप राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन राम नगर येथे होत असल्याचे टोंगसे यांनी सांगितले. याच दिवशी होमिओपॅथी उपचार शिबिरदेखील आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात डॉ. सूचिता जायभाये, डॉ. प्रभाकर जायभाये, डॉ. उदय ताकवाले, डॉ. प्रवीण इंगळे, डॉ. संजीवनी टोंगसे, डॉ. प्रभाकर वाकडे, डॉ. आदित्य नानोटे, डॉ. सत्यजित कुचर आणि मुंबईचे डॉ. बंदिश अंबानी तपासणी करून उपचार करणार आहेत. यानिमित्ताने शहरातील सुमारे २०० रिक्षाचालकांचा सन्मान केला जाणार असल्याचेही टोंगसे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला, डॉ. संजीवनी टोंगसे, डॉ. प्रभाकर जायभाये, डॉ. सूचिता जायभाये, डॉ. आदित्य नानोटी, डॉ. उदय ताकवाले, डॉ. प्रवीण इंगळे उपस्थित होते.