१४ महिन्यांनंतर पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४३ वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 09:55 AM2021-07-10T09:55:35+5:302021-07-10T09:58:08+5:30
Corona Cases in Akola : १४ महिन्यांपूर्वी म्हणजेच ४ मे २०२० रोजी जिल्ह्यात ४४ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
- प्रविण खेते
अकोला : जिल्ह्यात कोविडचा शिरकाव झाल्यानंतर कोविडच्या दोन लाटा आल्या. यादरम्यान जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला होता, मात्र दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील कोविडच्या ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४३ पर्यंत खाली आला आहे. यापूर्वी १४ महिन्यांपूर्वी म्हणजेच ४ मे २०२० रोजी जिल्ह्यात ४४ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अकोलेकरांसाठी हा मोठा दिलासा आहे, मात्र कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही.
७ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. ४ मे २०२० पर्यंत जिल्ह्यात कोविडचे ४४ ॲक्टिव्ह रुग्ण होते. त्यानंतर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत गेला. जून, जुलै महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७०० पेक्षा जास्त होती. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात कोरोनाची पहिला लाट आली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाने कहर केला. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५०० पेक्षा जास्त झाली. रुग्णांना ऑक्सिजनची खाट मिळणेही कठीण झाले होते. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढीवर काही प्रमाणात अंकुश लागला होता, मात्र ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८०० च्या वरच होती. जानेवारी २०२१ च्या अखेरीस कोविड रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. फेब्रुवारीत कोविडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेत ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५ हजारांपेक्षा जास्त झाला होता, मात्र जूनच्या अखेरीस ही लाट ओसरू लागली. ९ जुलै रोजी पहिल्यांदाच जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४३ वर आला. जिल्ह्याची वाटचाल कोविडमुक्तीकडे असली तरी कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे.
रुग्णांची स्थिती
रुग्णालयात दाखल रुग्ण - २०
गृह विलगीकरणातील रुग्ण - २३
असा आहे ॲक्टिव्ह रुग्णांचा आलेख
तारीख - ॲक्टिव्ह रुग्ण
९ जुलै - ४५
८ जुलै १०४
७ जुलै - १६४
३० जून - ३७७
१ जून - ४१२१
३० मे - ४६१०
१ मे - ५३८२
३० एप्रिल - ५३०२
१ एप्रिल - ५३३९
३१ मार्च - ५७८४
२८ फेब्रुवारी - ३२३९
१ फेब्रुवारी - ६९७
३१ जानेवारी - ७१८
१ जानेवारी - ४२४
९ जुलै २०२० - ३६८
७ मे २०२० - ७०
४ मे २०२० - ४४