चार महिन्यांत पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 10:44 AM2021-06-19T10:44:11+5:302021-06-19T10:44:11+5:30
Corona Cases in Akola : जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९९८ वर आली आहे.
अकोला : कोविडची दुसरी लाट ओसरू लागली आहे. नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असून, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९९८ वर आली आहे. मागील चार महिन्यांत ॲक्टिव्ह रुग्णांची सर्वांत कमी संख्या आहे. त्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला, मात्र कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने विशेष खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद रूप धारण करीत केले. शेकडोंनी वाढणाऱ्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत गेला. वेळेवर खाटा न मिळाल्याने अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. वाढत्या रुग्णांमुळे साधनसामग्री आणि इंजेक्शनची टंचाई भासू लागली. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वाढत गेलेला ॲक्टिव्ह बाधित रुग्णांचा आकडा हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ६ हजार ८२० वर पोहोचला. पुढे १५ एप्रिलपर्यंत त्यात काहीशी घटही दिसली. पण, तो ४ हजारांच्या खाली गेला नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र रुग्णांची संख्या घटत गेली आहे. मागील पंधरा दिवसांत ही स्थिती आणखी चांगली होत गेली. शुक्रवार, १८ जून रोजी जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ९९८ पर्यंत खाली आला. मागील चार महिन्यांत पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा एवढा कमी झाला आहे.
दिलासादायक बाब, पण...
ॲक्टिव्ह बाधित रुग्णांच्या आकड्यात झालेली घट ही दिलासादायक आहे. मात्र सद्य:स्थितीत सार्वजनिक ठिकाणी वाढणारी बेपर्वाई लक्षात घेता हा आकडा कधीही वाढू शकतो. त्यामुळे कोरोनाला संपविण्यासाठी प्रत्येकाने खबरदारीने वावरले पाहिजे, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.
कोरोनाला संपविण्यासाठी सुरक्षात्मक खबरदारी घेऊन, मास्कचा वापर करून, गर्दीची ठिकाणे टाळून शून्याच्या प्रवासाकडे वाटचाल करायची आहे. टाळेबंदीच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी दाखविलेल्या शिस्तीमुळे रुग्णांचा आकडा कमी होत आहे. तो शून्य होईपर्यंत सर्वांना पुढील काळात अशीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक
मागील चार महिन्यांतील स्थिती
१ फेब्रुवारी : ६९७
१५ फेब्रुवारी : ९९८
२८ फेब्रुवारी : ३,४७६
०१ मार्च : ३,६६४
१५ मार्च : ६,८२०
३१ मार्च : ५,७८४
१ एप्रिल : ५,३३९
१५ एप्रिल : ४,०६८
३० एप्रिल : ५,३०२
१ मे : ५,३८२
१५ मे : ६,८२०
३१ मे : ४,३५१
१ जून : ४,१२१
१८ जून : ९९८