डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भारतात प्रथमच कोहळ्यापासून बनविली चेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:52 AM2018-12-19T11:52:37+5:302018-12-19T11:52:52+5:30
ग्रासरूट इनोव्हेटर : भारतात प्रथमच कोहळ्यापासून चेरी, टुटीफ्रुटी बनविण्याचे यशस्वी तंत्रज्ञान विकसित केले आहे.
- राजरत्न शिरसाट (अकोला)
शेतकऱ्यांना खेड्यातच शेतमालावर प्रक्रिया करता यावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी अवजारांसह कृषी प्रक्रिया यंत्राची निर्मिती केली आहे. बाजारातील गरज लक्षात घेता चेरी, टुटीफ्रुटी तंत्रज्ञान विकसित केले आहे.
सध्या कच्च्या पपईपासून चेरी, टुटीफ्रुटी बनविण्यात येते. त्यासाठी विविध १२ प्रकारची चेरी, टुटीफ्रुटी बनविण्यात आली. पपईपासून बनलेल्या चेरी, तुटीफ्रुटीचा रंग, सुगंध,चव,पसंती इत्यादीबाबत परीक्षण करण्यात आले, तसेच कोहळ्यापासून बनलेल्या चेरीचेही परीक्षण करण्यात आले. या दोन्हीचा अभ्यास, परीक्षण करू न कोहळ्यापासून तयार करण्यात आलेल्या चेरी,टुटीफ्रुटी बनविण्याच्या सर्वोत्तम पद्धतीला निर्धारित करण्यात आले. अकोल्याच्या या कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतात प्रथमच कोहळ्यापासून चेरी, टुटीफ्रुटी बनविण्याचे यशस्वी तंत्रज्ञान विकसित केले आहे.
कोहळ्यापासून भुकटी व त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ या तंत्रज्ञानापासून तयार करता येतात. चेरी, टुटीफ्रुटी तयार करण्यासाठी सुरुवातीला कोहळ्याच्या गराचे तुकडे करू न त्यांना ०.७५ टक्के चुन्याच्या पाण्यात १२ तास ठेवले जाते. त्यानंतर तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन हे तुकडे ६० टक्के साखरेमध्ये १२ तास ठेवण्यात येतात. हे मिश्रण नंतर उकळविले जाते. उकळविण्याच्या शेवटी सोडियम बन्झोएट (०.२५ टक्के) चेरी, टुटीफ्रुटी ६० डिग्री ब्रिक्स गोडव्यापर्यंत तसेच सायट्रिक अॅसिड (०.०५ टक्के) यात टाकण्यात येते. यानंतर आल्यावर सुकविणे थांबवावे लागते. यातील जास्तीचा साखरेचा पाक गाळून चेरीला पंख्याखाली सुकविण्यासाठी ठेवण्यात येते. त्यानंतर बॅगमध्ये पॅकिंग करून त्याची विक्री करता येते.