दुष्काळाचा पहिला ट्रिगर तीन तालुक्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:25 AM2017-10-30T01:25:25+5:302017-10-30T01:25:47+5:30
अकोला : शासन स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अकोल्यातील अकोला, पातूर व अकोट या तीन तालुक्यांत दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे.
राजेश शेगोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासन स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अकोल्यातील अकोला, पातूर व अकोट या तीन तालुक्यांत दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे. जिल्हा दुष्काळ देखरेख समितीद्वारा असा अहवाल आयुक्त कार्यालय स्तरावर पाठविण्यात आला असून, या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला टप्पा घोषित होण्याचे संकेत आहेत.
शासन जाहीर करीत असलेली खरिपाची हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी आणि कमी उत्पन्नावर दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत होती. यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाने आता दुष्काळ व्यवस्थापन संहिता २0१६ मध्ये दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती ठरवून दिली आहे. खरीप २0१७ पासून या निकषानुसारच दुष्काळ जाहीर करण्याचे निर्देश शासनाने ७ ऑक्टोबर रोजी दिले आहेत.
त्यानुसार दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदा आद्र्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, सत्यापन विचारात घेऊन समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक हा पहिलाच घटक आहे. या घटकामुळेच अकोल्यातील तीन तालुक्यांत दुष्काळाचा पहिला टप्पा लागू होणार आहे.
निर्देशांकानुसार पावसाची सरासरी कमी
- दुष्काळासंदर्भात हा अनिवार्य निर्देशांक आहे. यामध्ये पर्जन्यमानाचे विचलन, पर्जन्यमानातील खंड तसेच जून व जुलै महिन्यात एकूण सरासरी पर्जन्याच्या ५0 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास व जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास दुष्काळाची प्रथम कळ लागू होणार आहे.
- पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार अकोल्यात ३ ते १६ जुलै व ८ ऑगस्ट ते १८ ऑगस्टपर्यंत पावसाने दडी मारली होती. अकोटात ३ ते १२ जुलै व १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट व पातूरमध्ये ५ ते १३ जुलै व ५ ते १४ ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड होता. साधरणपणे अशीच स्थिती इतर तालुक्यांची असली, तरी अकोला, अकोट व पातूर या तालुक्यात पावसाची सरासरी ही ७0 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे हे तीन तालुके दुष्काळाच्या पहिल्या टप्यासाठी पात्र ठरत आहेत.
असे आहेत निकष
दुष्क ाळाची तीव्रता ठरविण्यासाठी पर्जन्यमानासोबतच प्रभावदर्शक निर्देशांक यामध्ये वनस्पतीशी निगडित निर्देशांक, सामान्य फरक आद्र्रता निर्देशांक, वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आद्र्रता निर्देशांक तसेच जलविषयक निर्देशांक यामध्ये भूजल पातळी निर्देशांकाचा समावेश आहे.