'फिट अकोला' हाफ मॅराथॉन रविवारी; चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकरही धावणार!
By Atul.jaiswal | Published: March 9, 2024 06:27 PM2024-03-09T18:27:03+5:302024-03-09T18:29:08+5:30
अभिनेत्री किशोरी शहाणे विज याही सहभागी होणार आहेत.
अतुल जयस्वाल, अकोला: निरामय आरोग्याचे महत्त्व सांगणाऱ्या व अकोल्याला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय क्रीडा पटलावर आणणाऱ्या 'फिट अकोला' हाफ मॅराथॉनचा शुभारंभ रविवारी (१० मार्च) सकाळी साडेपाच वाजता वसंत देसाई स्टेडियम येथून होईल. त्यात प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकर धावणार आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे विज याही सहभागी होणार आहेत.
शहरात प्रथमत:च आयोजित होत असलेल्या २१ किमी लांबीच्या हाफ मॅराथॉनबद्दल अकोलेकरांच्या मनात प्रचंड औत्सुक्य आहे. उपक्रमाला अकोलेकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असून, साडेतीन हजारापर्यंत नोंदणी झाली आहे. २१ किमी, १० किमी व ५ किमी या तीन प्रकारांत होणार आहे. २१ किमीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे, १० किमीसाठी किमान १६ वर्षे आणि ५ किमीसाठी १२ वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.अनेक खेळाडू, नागरिक या उपक्रमात सहभागी होणार असून, ‘फिट अकोला’ या उपक्रमाची सर्वदूर ओळख निर्माण होणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केला.
असा आहे मार्ग
वसंत देसाई क्रीडांगण येथून स्पर्धेला सुरुवात होईल. पुढे ती दुर्गा चौक, नेहरू पार्क चौक, संत तुकाराम चौक, अशोक वाटिका मार्गे पुन्हा वसंत देसाई क्रीडांगण येथे येऊन थांबेल.
अशी आहेत बक्षीसे
स्पर्धेत १८ ते ४५, तसेच ४५ वर्षांवरील असे वेगळे गट असून, स्वतंत्र तीन बक्षीसे देण्यात येतील. त्याचप्रमाणे २१ किमी स्पर्धेतील पुरूष व महिला गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार रुपये, १५ हजार व ११ हजार रू. अशी तीन बक्षीसे देण्यात येतील.