फिट इंडियामुळे क्रीडा शिक्षक होणार ‘अनफिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 03:10 PM2020-02-11T15:10:20+5:302020-02-11T15:11:22+5:30
अतिरिक्त तासिका मिळणार नसल्यामुळे कामाच्या व्यापात क्रीडा शिक्षकच अनफिट होतील.
- नीलिमा शिंगणे-जगड
बालेवाडी पुणे येथे फिट इंडिया अंतर्गत शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी मास्टर ट्रेनिंग शिबिर पार पडले. प्रत्येक जिल्ह्यातील पाच ट्रेनर जिल्हास्तरावर शिक्षकांना ट्रेनिंग देणार असून, फिट इंडिया हा प्रोग्राम प्रत्येक शाळेत उपलब्ध वेळातच राबवायचा आहे. यामुळे शिक्षकांचे काम वाढणार आहे; मात्र तासिका तेवढ्याच राहणार आहेत. अतिरिक्त तासिका मिळणार नसल्यामुळे कामाच्या व्यापात क्रीडा शिक्षकच अनफिट होतील. विद्यार्थी मात्र फिट होणार आहेत.
क्रीडा शिक्षकांना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या अधिकृत लिंकला भरावयाची आहे. या अंतर्गत ठरवून दिलेल्या सर्व चाचण्यांची माहिती शारीरिक शिक्षकाला वेळोवेळी अपलोड करावयाची आहे. तसेच फिटनेस चाचण्या घेणे, गुणांकन करणे, ती माहिती आॅनलाइन अपलोड करणे, प्रोग्रेस कार्ड पालकांना देणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत. या चाचण्या वर्षातून दोन वेळा घ्याव्या लागणार आहेत. प्रोग्रेस कार्डद्वारे या क्षमता पालकापर्यंत पोहोचविण्याचे काम शिक्षकाला करावे लागणार आहे.
फिट इंडिया मुव्हमेंट ही संकल्पना क्रीडा विभागाची आहे. शारीरिक शिक्षण शिक्षकाची आस्थापना शिक्षण विभागाशी आहे. फिट इंडिया मुव्हमेंटसाठी क्रीडा विभाग राबवतो आहे. त्यामुळे शिक्षकांनाही क्रीडा विभागाचे काम विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी करावे लागणार. शारीरिक शिक्षण शिक्षकाचा क्रीडा विभागाशी संबंध फक्त स्पर्धेपुरता येतो; मात्र या योजनेमुळे शिक्षक सतत क्रीडा विभागाशी संपर्कात राहणार आहे. फिट इंडिया चाचण्या घेऊन मूल्यांकन करावयाचे आहे. हे मूल्यांकन अभ्यासक्रमाशी वा पाठ्यक्रमाशी जोडले जाणार आहे. याकरिता वाढीव तासिका मिळणार नाही. शिक्षकांना वेळ दिल्यास फिट इंडिया मुव्हमेंट ही संधी होईल.
निर्धारित अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम पूर्ण करणे व खेळ सराव घेणे यासाठीच तासिका कमी पडतात तर फिट इंडिया मुव्हमेंट राबविण्यासाठी, त्याचे मूल्यांकन करणे, वर्षातून दोन वेळा टेस्ट घेणे, गुण आॅनलाइन अपलोड करणे ही कामे शिक्षकांचीच वाढणार आहेत. तसेच शालेय स्तरावर अभ्यासक्रमाशी निगडित प्रात्यक्षिक परीक्षा व मूल्यमापन या बाबी नेहमीप्रमाणे कराव्या लागणार आहेतच. अभ्यासक्रमाशी निगडित प्रात्यक्षिक परीक्षा व मूल्यांकन या बाबी फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत चाचणी व त्याचे मूल्यांकन यांच्याशी जोडल्या गेल्या पाहिजेत. शिक्षण विभागामार्फत हे राबविले पाहिजे. अन्यथा याकडे एक प्रयोग म्हणूनच पाहिल्या जाईल.
प्रात्यक्षिक परीक्षेअंतर्गत गुणांकनासाठी फिट इंडिया चाचणीचे गुणही विचारात घेतल्यास सातत्य टिकू शकेल. अन्यथा ही क्रीडा खात्याची फक्त योजना म्हणून राहील. चाचणी घेतल्याने विद्यार्थी फिट होईल असे नाही. विद्यार्थी फिट होण्यासाठी निधारित क्षमता प्राप्त होणे आवश्यक आहे. याबाबत काहीच निर्देश नाहीत. या बाबी अभ्यासक्रमाशी जोडून प्रात्यक्षिकात समावेश होणे आवश्यक आहे, असे क्रीडा तज्ज्ञांचे मत आहे.