काळवीट शिकारप्रकरणी पाच आरोपींना वनकोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:22+5:302021-05-19T04:18:22+5:30
वन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, रविवार, १६ मे रोजी अकोला प्रादेशिक वन विभागाअंतर्गत बाळापूर तालुक्यातील फरमर्दाबाद येथील शेत शिवारामध्ये ...
वन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, रविवार, १६ मे रोजी अकोला प्रादेशिक वन विभागाअंतर्गत बाळापूर तालुक्यातील फरमर्दाबाद येथील शेत शिवारामध्ये वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याची गुप्त माहिती वन विभागास प्राप्त झाली. त्यानुसार अकोला वन विभागाचे वनपाल जी. डी. इंगळे व वनरक्षक आर. के. बिडकर यांच्या नेतृत्त्वात वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन कर्मचाऱ्यांनी सुनियोजित पद्धतीने शिकारी टोळीचा पाठलाग करुन पाच संशयित शिकाऱ्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये अकोट तालुक्यातील जऊळखेड येथील जगदेव शहादेव बागडे, वय ३८, सागर इंदोरे वय २४, संतोष गणेश इंदोरे, वय ३०, ईश्वर बाळकृष्ण इंदोरे, वय २६ तसेच बाळापूर तालुक्यातील फर्माबाद येथील पंकज भीमराव शिरसाट, वय २१ यांचा समावेश आहे. या घटनेत अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या संशयितांनी गावठी बंदुकीच्या सहाय्याने एका काळविटाची शिकार केली व अन्य एका काळवीटाला बांधून ठेवले होते. बांधून ठेवलेल्या काळवीटाला सकाळी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. संशयितांकडून घटनास्थळावरून एक मृत काळवीट, दोन धारदार शस्त्र, बंदुकीचे छर्रे, सुतळी फटाके, बारुद, माचिस, मोबाईल, तीन मोटारसायकल व साहित्य जप्त करण्यात आले. या संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची वनकोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास अकोला येथील उपवन संरक्षक के. आर. अर्जुना व सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी, अकोला आर. एन. ओवे करीत आहेत.
आलेगाव शिवारात १४ रानडुकरांची विहिरीतून सुटका
आलेगाव शेत शिवारात गजानन लोभाजी उगले यांच्या शेतातील विहिरीमध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वन्यप्राणी रानडुक्कर पडल्याने श्रीधर लाड यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना, सुरेश वडोदे, वन परिक्षेत्र अधिकारी पातुर डी. डी. मदने यांच्या मार्गदर्शनाखाली आलेगाव वन परिक्षेत्रातील वन्यप्राणी रेस्क्यु पथक पाठवून विहिरीत पडलेल्या १६पैकी १४ रानडुकरांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आले. उर्वरित दोन रानडुक्कर हे सुटका करतांना मृत अवस्थेत आढळून आले. मृत रानडुकरांचा पंचनामा केला, अशी माहिती उपवन संरक्षक के. आर. अर्जुना यांनी दिली आहे.