पाच एकरातील हरभरा गंजीला आग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:35 AM2021-02-21T04:35:35+5:302021-02-21T04:35:35+5:30
हातरुण: पाच एकर शेतातील हरभऱ्याच्या गंजीला आग लावण्यात आल्याने शेतकऱ्याचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी पहाटे ...
हातरुण: पाच एकर शेतातील हरभऱ्याच्या गंजीला आग लावण्यात आल्याने शेतकऱ्याचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी पहाटे हातरुण शेतशिवारात घडली. घटनास्थळी उरळ ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी भेट देऊन पाहणी केली.
हातरुण गावालगत शेतकरी शेख बिस्मिल्ला मोहम्मद हनिफ यांची ५ एकर शेती आहे. या शेतात त्यांनी हरभऱ्याची पेरणी केली होती. त्यानंतर शेतातील हरभऱ्याची सोंगणी केली. तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हातरुण परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सोंगणी केलेला हरभरा जमा करून शेतात ताडपत्रीने झाकून ठेवला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास हरभरा गंजीमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. वीस ते पंचवीस क्विंटल हरभरा आगीत जळून खाक झाला. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकाची राखरांगोळी झाल्याने शेतकऱ्याचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हरभरा गंजीला आग लागल्याची माहिती मिळताच उरळ ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी सरपंच वाजिद खान, माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नासीर खान, मोहम्मद हनिफ, शेतकरी शेख बिस्मिल्ला, नीलेश बेंडे हजर होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
●●●