नाशिक जिल्ह्यातील डांग्या सुळक्यावर पाच अकोलेकर गिर्यारोहकांची चढाई
By Atul.jaiswal | Published: March 18, 2024 01:14 PM2024-03-18T13:14:55+5:302024-03-18T13:16:35+5:30
मूळागाव हे या सुडक्याचे पायथ्याचे गाव.
अतुल जयस्वाल, अकोला :अकोला डिस्ट्रिक्ट मौन्टीनीरिंग असोसिएशन आणि अमरावती डिस्ट्रिक्ट मौन्टीनीरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,१७ मार्च रोजी पार पडलेल्या गिर्यारोहण मोहिमेत अकोल्यातील पाच गिर्यारोहकांनी नाशिक जिल्ह्यातील अतिशय खडतर असा १७५ फुट उंच डांग्या सुळका सर केला. नाशिक पासून ३० कीमी अंतरावर असलेला डांग्या सुळका सहयाद्रीमधील इगतपुरी तालुक्यात येतो.
मूळागाव हे या सुडक्याचे पायथ्याचे गाव. या गावापासून १ तासाच्या मध्यम श्रेणीचा ट्रेक (पायी चालत जाणे सर्व साहित्य सह) केल्यानंतर सुळक्याच्या पायथ्याचे दर्शन होते. सुळका दिसायला जेवढा दिसायला सुंदर आहे तितकाच चढण्याकरिता खडतर असून याची साधारणतः उंची १७५ फूट इतकी आहे. डांग्या सुळका कोणत्याही पर्वत रांगेमध्ये येत नसून ज्वालामुखीच्या उद्रेकांतून खडकांनी निर्माण होऊन स्वतंत्र उभा आहे. त्याचे हे वैशिष्ट्य गिर्यारोहकांना मोहित करते.
अकोला डिस्ट्रिक्ट मौन्टीनीरिंग असोसिएशन आणि अमरावती डिस्ट्रिक्ट मौन्टीनीरिंग असोसिएशनच्या सदस्यांनी रविवार, १७ मार्च रोजी सकाळी ६ सुमारास मोहिमेला सुरुवात केली. सरळसोट असा हा सुळका चढण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागली. दुपारी २ वाजेपर्यंत यशस्वीरित्या सुळक्यावर चढून सर्वांनी सुखरुप उतराई केली. या मोहिमेत अकोल्याचे अश्विन दाते, धिरज कातखेडे, पूजा जंगम, कल्पेश ढोरे,शिवराज बुले यांच्यासह पुणे येथील शिवम सोनार अमरावती येथील हेमंत थेटे या गिर्यारोहकांनी सहभाग नोंदविला होता. या मोहिमेदरम्यान मुळेगाव येथील ज्ञानेश्वर भगत यांच्याकडून स्थानिक मदत मिळाली.