बारावीचे पाच कॉपीबहाद्दर निलंबित
By admin | Published: March 5, 2016 02:48 AM2016-03-05T02:48:18+5:302016-03-05T02:48:18+5:30
दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान आतापर्यंत २२ विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अकोला: बारावीच्या परीक्षेदरम्यान शुक्रवारी शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी जिल्हय़ातील परीक्षा केंद्रांवर धाड घालून पाच कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना निलंबित केले. दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान आतापर्यंत २२ विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गत काही दिवसांपासून इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षेस प्रारंभ झाला. शुक्रवारी इयत्ता बारावीत शिकणार्या विद्यार्थ्यांचा जीवशास्त्र विषयाचा पेपर होता. या पेपरदरम्यान शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य आणि महिला भरारी पथकाने घातलेल्या धाडीमध्ये शुक्रवारी पेपरदरम्यान तुळसाबाई कावल कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर तीन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. शहरातील सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एक आणि पारस येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला. या पाचही विद्यार्थ्यांंना शिक्षणाधिकार्यांनी दोन वर्षांसाठी निलंबित केले. शनिवारी इयत्ता दहावीचा अत्यंत महत्त्वाचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. यावेळी गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभागानेखबरदारी घेतली.