तीन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 02:47 AM2017-05-17T02:47:47+5:302017-05-17T02:47:47+5:30
बोरगाव मंजू : अकोला येथील एका ४० वर्षीय इसमाची आपातापानजीक बंधु गोट्याजवळ हत्या केल्याची बाब ८ मे रोजी उघडकीस आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : अकोला येथील एका ४० वर्षीय इसमाची आपातापानजीक बंधु गोट्याजवळ हत्या केल्याची बाब ८ मे रोजी उघडकीस आली होती. बोरगाव मंजू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला. सदर खूनप्रकरणी अखेर सोमवारी पोलिसांनी तीन जणांना जेरबंद करून आज मंगळवारी, १६ मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० मे पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
आपातापानजिक बंधु गोट्याजवळ एका ४० वर्षीय इसमाचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासादरम्यान निष्पन्न झाले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दरम्यान सदर मृत हा जगतसिंग रतीरामसिंग कुशवाह रा. खोलेश्वर, अकोला असल्याची ओळख पटवली होती. सदर खूनप्रकरणी मृताची पत्नी गुड्डन जगतसिंग कुशवाह हिला संशयित म्हणून ठाणेदार पी. के. काटकर यांनी घटनेच्या दिवशी ताब्यात घेतले होते. पुढील तपासादरम्यान कल्लु ऊर्फ सुनील कुशवाह, धर्मेंद्र रामप्रसाद कुशवाह यांना पोलिसांनी मूळगाव कानीज उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. १५ मे रोजी गुड्डन कुशवाह, धर्मेंद्र कुशवाह, कल्लु ऊर्फ सुनील कुशवाह या तिघांवरही भादंवि ३०२, १२० ब ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना १६ मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० मे पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असून, पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर करीत आहेत.