भाजपा उमेदवाराच्या घरातून पाच डमी ईव्हीएम जप्त !
By admin | Published: February 22, 2017 02:43 AM2017-02-22T02:43:57+5:302017-02-22T02:43:57+5:30
उमेदवार सुजाता अहीरसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला, दि. २१-मतदान आटोपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी प्रभाग १३ मधील भाजपाचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापा टाकून पाच डमी ईव्हीएम जप्त केल्या. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी छापा टाकून ही कारवाई केली असून भाजपा उमेदवार सुजाता अहीर आणि त्यांचे पती देवराव अहीर यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.
महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील या प्रभाग १५ मधून जात असताना त्यांना भाजपाचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्या घरी गर्दी दिसली. त्यांनी नागरिकांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान, याचवेळी उमेदवार पती देवराव अहीर तिथे आले. अहीर यांनी प्रिया पाटील यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी काही काळ खडाजंगी झाली. या प्रकारामुळे त्यांनी अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावून त्यांच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पाच डमी ईव्हीएम मिळून आल्या.
यासंदर्भात पोलिसांनी अहीर यांची विचारणा केली असता त्यांच्याकडून सर्मपक उत्तर देण्यात आले नाही. मोठय़ा प्रमाणात घरासमोर गर्दी जमवून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यानंतरही पोलिसांशी उर्मट भाषेत संभाषण केल्याने तसेच डमी ईव्हीएम मशीन मिळाल्याने भाजपा उमेदवार सुजाता अहीर आणि त्यांचे पती देवराव अहीर यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनीही पोलीस स्टेशन गाठून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी सदर प्रकरणाबाबत पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
अहीर यांच्या घरासमोर बेकायदेशीर मंडळी जमविण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन या ठिकाणी सुरू असताना पोलिसांनी त्यांना विचारणा केली; मात्र अहीर यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.
- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक