स्ट्रक्चर आॅडिटमध्ये ‘जीएमसी’च्या पाच इमारती धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:17 PM2019-11-09T12:17:50+5:302019-11-09T12:17:57+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ‘व्हीएनआयटी’ मार्फत इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले.
- प्रवीण खेते
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील पाच इमारती धोकादायक स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ‘जीएमसी’तील ९२ वर्षे जुन्या इमारतीसोबतच इतर चार इमारतींचा समावेश असून, स्ट्रक्चर आॅडिट दरम्यान तपासणी करणाऱ्या चमूने याबाबत खुलासा केला आहे.
पावसाळ््यात सर्वोपचार रुग्णालयातील ९२ वर्षे जुन्या इमारतीला गळती लागली होती. संभाव्य धोका पाहता ‘लोकमत’ने जुलै २०१९ मध्ये इमारतीच्या स्ट्रक्चर आॅडिटचा विषय लावून धरला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून, रविवार, ३ नोव्हेंबर रोजी स्ट्रक्चर आॅडिटचा मुहूर्त काढण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ‘व्हीएनआयटी’ मार्फत इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यावेळी ‘व्हीएनआयटी’चे प्रा. इंगळे आणि प्रा. व्यवहारे यांनी इमारतीच्या पाहणीवेळी पाचही इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पाचही इमारती सर्वोपचार रुग्णालयाचा कणा असून, याच इमारतींमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार केला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चर आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसला, तरी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान व्हीएनआयटीच्या चमूने पाचही इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट केले होते.
वर्षभरानंतर आली जाग
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गत वर्षभरापासून पत्रव्यवहार सुरू होते. इमारतीच्या स्ट्रक्चर आॅडिटसाठी जीएमसी प्रशासनातर्फे ४ ते ५ लाख रुपयांचा निधीही सार्वजनिक बांधकाम विभागाला वळता केला होता. अखेर वर्षभरानंतर सार्वजनिक बांधकाम विभागासह व्हीएनआयटीला जाग आली.
इमारतींमध्ये महत्त्वाचे वॉर्ड व कार्यालय
अतिदक्षता कक्ष
सर्जरी वॉर्ड
सोनोग्राफी, एक्स-रे कक्ष
सार्वजनिक वॉर्ड,
प्रसूतीगृह
ब्लड बँक
महिला वॉर्ड
बाह्यरुग्ण विभाग
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय
सर्वोपचार रुग्णालयाची सर्वात जुनी इमारत १९२७ मध्ये बांधण्यात आली होती. त्यामुळे या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट आवश्यक होते. रविवार, ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत व्हीएनआयटीच्या पथकाने पाचही इमारतींचे स्ट्रक्चर आॅडिट केले असून, या इमारती धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले; परंतु अद्याप अधिकृत अहवाल आला नाही.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.
‘व्हीएनआयटी’च्या पथकाने ३ नोव्हेंबर रोजी जीएमसीच्या इमारतींचे स्ट्रक्चर आॅडिट केले. त्याच्या अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.
- सुधीर ढिवरे, कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग, अकोला.