पारस दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत घोषित ! गिरीश महाजन यांची माहिती

By संतोष येलकर | Published: April 10, 2023 08:20 PM2023-04-10T20:20:39+5:302023-04-10T20:20:50+5:30

सर्व जखमींवर शासन खर्चातून होणार उपचार.

Five lakh aid announced to the families of the deceased in the Paras accident! Girish Mahajan's information: Treatment of the injured at government expense | पारस दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत घोषित ! गिरीश महाजन यांची माहिती

पारस दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत घोषित ! गिरीश महाजन यांची माहिती

googlenewsNext

अकोला: अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे टिनपत्राच्या सभामंडपावर कडूनिंबाचे झाड कोसळून सात भाविक ठार झाल्याची घटना रविवारी अकोला जिल्हयातील बाळापूर तालुक्यात पारस येथील बाबुजी महाराज संस्थान येथे घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेतील सात मृतकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने घोषित केली आहे. तसेच जखमींवर शासन खर्चातून उपचार करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी येथे दिली.

अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पारस येथील दुर्घटनेतील जखमींची भेट घेवून त्यांच्या प्रकृती विचारपूस करीत जखमी रुग्णांवर सुरु असलेल्या उपचाराची गिरीश महाजन यांनी आरोग्य यंत्रणांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पारस येथील दुर्घटना अतिशय गंभीर असून, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सात भाविकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत शासनाने घोषित केली असून, दुर्घटनेतील २४ जखमींवर शासन खर्चातून उपचार सुरु आहेत.

मृतकांच्या कुटुंबियांना शासन निकषानुसार मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींपैकी फ्रॅक्चर आणि अन्य गंभीर दुखापत असलेल्या जखमींना मदत करण्याचा प्रयत्न असून, जखमीपैकी गंभीर असलेल्या एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी लवकरच धोक्याबाहेर येणार असल्याचे महाजन यांनी सांगीतले. मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे सभामंडपावर झाड कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून, गावकऱ्यांनी हातभार लावून मदतकार्य करण्यात आले, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ.मिनाक्षी गजभिये, माजी महापौर अर्चना मसने, अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

....................................
विरोधकांकडून विनाकारण

कुरापती काढण्याचे काम सुरु !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिग्री’च्या मुद्दयांसह इतर मुद्दयांवर विरोधकांकडून विनाकारण कुरापती काढण्याचे काम सुरु असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. डिग्री पाहून जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला निवडून दिले नाही तर त्यांचे काम पाहून निवडून दिले, असे महाजन यांनी यावेळी सांगीतले.

Web Title: Five lakh aid announced to the families of the deceased in the Paras accident! Girish Mahajan's information: Treatment of the injured at government expense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.