नोकरीचे आमिष देऊन बेरोजगारास पाच लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 01:44 PM2019-09-09T13:44:01+5:302019-09-09T13:44:44+5:30
सुशिक्षित बेरोजगार युवक शेखर नामदेव ठाकरे याची सुमारे पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार शेखर यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्याकडे केली आहे.
अकोला: बाळापूर तालुक्यातील कसुरा येथील दत्तराज महाराज विद्यालयात कर्मचारी असलेल्या राजू चव्हाण व चोपडे नामक दोघांनी लहान उमरीतील भगतसिंग चौकातील रहिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक शेखर नामदेव ठाकरे याची सुमारे पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार शेखर यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्याकडे केली आहे.
बाळापूर तालुक्यातील कसुरा येथील श्री दत्तराज महाराज विद्यालय शाळेवरील कर्मचारी राजू चव्हाण व चोपडे यांनी शेखर ठाकरे यास रेल्वेत टीसी या पदावर नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दिले. तसेच यापूर्वी काही युवकांना नोकरीवर लावून दिल्याचेही या दोघांनी ठाकरे यांना सांगितले. दोन ते तीन युवकांची भेट घालून दिल्यानंतर शेखर ठाकरे यांना विश्वास बसला. त्यांनी या दोघांना पाच लाख रुपये दिले असून, या दोघांमधील चव्हाण नामक कर्मचाऱ्याने अनेक युवकांना फसविल्याचे तक्रारीत नमूद आहे. या फसवणूक प्रकरणातील चोपडे नामक व्यक्ती मुख्य सूत्रधार असल्याचे शेखर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शेखर ठाकरे यांनी घरातील दागदागिने विकून संजय निमकंडे आणि मधुकर आरेकर यांच्यासमक्ष सदर दोघांना पाच लाख रुपयांची रक्कम दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे; मात्र नोकरी लावून न दिल्याने तसेच गत अनेक दिवसांपासून टाळाटाळ करीत असल्याने फसवणूक झाल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावला असता सदर दोघांनी ४ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला; मात्र खात्यात रक्कमच नसल्याने तो धनादेश परत आला. तेव्हा राजू चव्हाण याने ठाकरे यांची भेट घेऊन धनादेश लावू नका, अशी विनंती करीत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले; मात्र त्यानंतरही रक्कम परत मिळत नसल्याने शेखर ठाकरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली असून, सदर दोघांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
सदर दोन कर्मचाऱ्यांनी ठाकरे या युवकाची रेल्वेत टीसी लावून देण्याचे आमिष देऊन पाच लाख रुपयांनी फसवणूक केली. ही बाब सिद्ध झाली असून, दोन्ही कर्मचाºयांना ठाकरे यांची रक्कम परत करण्याच्या सूचना केल्या आहेत. रक्कम तातडीने परत न केल्यास विधिज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दोघांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
- सेवकराम ताथोड, अध्यक्ष, श्री दत्तराज महाराज विद्यालय कसुरा.