प्रतिबंधित गुटख्यासह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:54+5:302021-03-24T04:16:54+5:30
एमआयडीसी पोलिसांची कारवाई अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका वाहनात सुमारे एक लाख रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल घेऊन ...
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका वाहनात सुमारे एक लाख रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल घेऊन जात असलेल्या एका वाहनास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी पकडले. या वाहनासह सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
बैदपुरा येथील रहिवासी आदिल खान फिरोज खान हा एका वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर पाळत ठेवून मूर्तिजापूर नाका परिसरातून वाहन चालकास ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये काली बहार, विमल गुटखा सुमारे एक लाख रुपये किमतीचा जप्त करण्यात आला, तसेच वाहन चार लाख रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तो अन्न व औषध प्रशासनाकडे सुपुर्द केला आहे. या प्रकरणी बैदपुरा येथील रहिवासी आदिल खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.