पिंप्री जैनपूर पाणीपुरवठा योजनेत पाच लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:22 PM2018-08-01T12:22:46+5:302018-08-01T12:25:22+5:30
अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेत अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती पदाधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड होत आहे.
अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेत अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती पदाधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड होत आहे. ती रक्कम वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने अंतिम नोटीस बजावल्याची माहिती आहे.
नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १७,५५,२५० रुपये शासकीय अनुदान मंजूर आहे. त्यापैकी १३,१७,०४५ रुपये अनुदान व लोकवर्गणीची १,९५,५०७ रुपये एवढी रक्कम ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या खात्यात जमा करण्यात आली. त्या रकमेतून समितीने पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले. कूपनलिका, पंपघर बांधकाम, उर्ध्ववाहिनी, पंपिंग मशिनरी, वीज जोडणी व साठवण टाकी बांधकाम बॉटम स्लॅबपर्यंत करण्यात आले. त्या कामाचे मूल्यमापन तांत्रिक सेवा पुरवठादाराकडून करण्यात आले. ते ८,५२,३७७ एवढे आहे. इतर खर्चासह ती रक्कम ९ लाख ३१,९५८ एवढी आहे. काम अपूर्ण असल्याने वरिष्ठांकडून सातत्याने पाठपुरावा झाला. त्यामुळे साठवण टाकीचा बॉटम स्लॅब, वॉलिंग, रूफ स्लॅबची कामे करण्यात आली. त्याचा खर्च मिळूनही १० लाख रुपये झाला. त्याचवेळी ५ लाख रुपये रक्कम समितीच्या खात्यात जमा असणे आवश्यक होते. त्याशिवाय, रकमेतून खरेदी केलेले कोणतेही साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे समितीने ५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. ती रक्कम शासनजमा करण्याचे सातत्याने बजावण्यात आले. त्याशिवाय, फौजदारी कारवाईचा इशाराही नोटिसमधून देण्यात आला; मात्र ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर कोणताच फरक पडला नाही. त्यानंतर समितीने किरकोळ स्वरूपाचे काम केले. त्या कामाचे मूल्यांकन करून उर्वरित रक्कम शासनजमा करा, ती न केल्यास समिती सदस्यांवर फौजदारी कारवाई का करू नये, अशी अंतिम नोटीस पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आल्याची माहिती आहे.