वाहनांवर दगडफेक करून तोडफोड करणाऱ्या पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:06 PM2019-12-25T13:06:52+5:302019-12-25T13:07:10+5:30
१0 ते १२ जणांच्या टोळक्याने हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौक व निशांत टॉवरसमोर दगडफेक करीत चार वाहनांची तोडफोड केली.
अकोला: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध तहफ्फुजे कानून कमिटीच्यावतीने रविवारी दुपारी अकोला क्रिकेट क्लबवर जनसभा घेतली होती. ही सभा आटोपल्यानंतर १0 ते १२ जणांच्या टोळक्याने हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौक व निशांत टॉवरसमोर दगडफेक करीत चार वाहनांची तोडफोड केली. दगडफेकीमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक वृद्ध महिला जखमी झाली होती. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना अटक केली.
अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध तहफ्फुजे कानून कमिटीच्यावतीने रविवारी दुपारी जनसभा घेतली. जनसभेनंतर बस स्टँडजवळील हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकात आल्यावर मोर्चातील काही विघ्नसंतोषी १0 ते १२ जणांच्या टोळक्याने अचानक पोलीस कर्मचाºयांसोबतच आॅटोरिक्षा, चारचाकी वाहनांवर दगडफेक केली. बस स्टँड चौक, निशांत टॉवरजवळील वझे फोटो स्टुडिओ, आर्य समाज मंगल कार्यालयाजवळीलही वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात १0 ते १२ व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३४१, ३५३, ३३२, ३३६, ४२७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा, कलम ७ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट १९३२ नुसार गुन्हा दाखल केला होता. तपास सुरू केल्यावर पोलिसांनी मोहम्मद खिजर अब्दुल रहीम रा. मोरखेवाडी, सैयद शमशोद्दीन सैयद मोबीन रा. अंबिका नगर, अब्दुल कलीम अब्दुल हफिज रा. गंगानगर, शेख इलियास शेख अयाज रा. देशपांडे प्लॉट आणि शाकीर खान अहमद खान रा. हमजा प्लॉट या पाच जणांना अटक केली. आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.