राष्ट्रीय महामार्गावरील नेहरू पार्क ते बाळापूर नाका डांबरीकरणाला निधीअभावी पाच मीटरची कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:26 AM2018-05-06T01:26:59+5:302018-05-06T01:26:59+5:30
अकोला : केवळ चाळीस लाख रुपयांअभावी नेहरू पार्क ते बाळापूर नाका मिनी बायपास या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच ते तीन मीटरची साइड कात्री लावली आहे. सव्वाचार किलोमीटरच्या या अंतरात दोन्ही बाजूने डांबरीकरणाची रुंदी कापल्या गेली आहे.
संजय खांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केवळ चाळीस लाख रुपयांअभावी नेहरू पार्क ते बाळापूर नाका मिनी बायपास या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच ते तीन मीटरची साइड कात्री लावली आहे. सव्वाचार किलोमीटरच्या या अंतरात दोन्ही बाजूने डांबरीकरणाची रुंदी कापल्या गेली आहे.
नेहरू पार्क चौक ते बाळापूर नाका या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे (४.२००) सव्वाचार किलोमीटर अंतराचे डांबरीकरण २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय निधीतून गेल्या पंधरवाडयात करण्यात आले. या डांबरीकरणाच्या कामासाठी २ कोटी ८६ लाख ९० हजार ४९६ रुपयांची मंजुरी देण्यात आली. बारा ते नऊ मीटर रुंद असलेल्या या मार्गाचे केवळ सात मीटर रुंदीकरण झाल्याने अनेक ठिकाणी पाच मीटर, तर काही ठिकाणी तीन मीटर रस्त्याचे डांबरीकरण करता आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य अकोलेकर बुचकळ्यात पडले आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, या मार्गाच्या दुहेरी रुंदीच्या डांबरीकरणासाठी अंदाजपत्रकातच सात मीटर नोंद आहे. वास्तविक पाहता मार्गाची रुंदी नऊ ते बारा मीटर असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने सात मीटरचे अंदाजपत्रक का काढले, यावर शंका उपस्थित होत आहे. कात्री लागलेल्या मार्गाच्या डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४० लाखांची अतिरिक्त तरतूद नसल्याने ही विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
अंदाजपत्रकानुसारच सात मीटर अंतराप्रमाणे दुहेरी मार्गाचे डांबरीकरण झाले आहे. २० एमएम जाडीचे कारपेट आणि सहा एमएमचे सीलकोट गुणवत्तेनुसार आहे. पूर्ण रुंदीच्या डांबरीकरणासाठी ३८ ते ४० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी लागला असता; मात्र तशी तरतूद नसल्याने रुंदी कमी दिसत आहे.
-मिथिलेश चव्हाण,
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला.
मार्गाच्या वास्तविक रुंदीप्रमाणे जर डांबरीकरण केले असते, तर दीड किलोमीटर डांबरीकरण करता आले नसते. या मार्गावरील दोन्ही बाजंूची शोल्डर साइड सुटली आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करणे उचित होणार नाही.
- श्रीराम पटोकार,
उपविभागीय अभियंता, अकोला.