पाच महिन्यांपूर्वी तक्रार नोंदविली, गुन्हा दाखलच झाला नाही!
By admin | Published: July 8, 2016 02:22 AM2016-07-08T02:22:40+5:302016-07-08T02:22:40+5:30
अकोला मनपातील बनावट प्रमाणपत्र: सिटी कोतवाली पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह
अकोला: महापालिकेच्या स्वच्छता विभागातील तीन महिला सफाई कर्मचार्यांनी सादर केलेले आरोग्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाने १२ फेब्रुवारी रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मनपाला तक्रार नोंदवून पाच महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्यामुळे पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
महापालिकेच्या स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी पदावर कार्यरत तीन महिला कर्मचार्यांनी ऐच्छिक सेवानवृत्ती घेण्यासाठी आपण काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर केले होते. तीनही कर्मचार्यांनी सवरेपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षरीचे सादर केलेल्या प्रमाणपत्राबाबत महापालिका आयुक्त अजय लहाने यांना शंका आल्याने त्यांनी कर्मचार्यांनी सादर केलेले प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवले. शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार असे कोणतेही प्रमाणपत्र जिल्हा सवरेपचार रुग्णालयातून देण्यात आले नसल्याचे मनपाला कळवले. बनावट प्रमाणपत्राचा भंडाफोड करण्याच्या उद्देशातून आयुक्त अजय लहाने यांनी तीनही महिला सफाई कर्मचार्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्याचे निर्देश सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर यांना दिले. घनबहाद्दूर यांच्या मार्गदर्शनाखाली १२ फेब्रुवारी रोजी पोलीस तक्रार नोंदवण्यात आली. सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदवून प्रशासनाला पाच महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, हे विशेष. गुन्हा दाखल करण्यास होणारी टाळाटाळ पाहता सिटी कोतवाली पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.