आणखी पाच मंगल कार्यालयांना ठाेकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:23 AM2021-08-24T04:23:48+5:302021-08-24T04:23:48+5:30
अकाेला : बांधकाम परवानगी, पार्किंग, अग्निशमन विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रासह विविध निकषांची पूर्तता न करणाऱ्या हाॅटेल, मंगल कार्यालये, तसेच लाॅन्सला ...
अकाेला : बांधकाम परवानगी, पार्किंग, अग्निशमन विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रासह विविध निकषांची पूर्तता न करणाऱ्या हाॅटेल, मंगल कार्यालये, तसेच लाॅन्सला सील लावण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने जारी केला आहे. त्या पृष्ठभूमीवर साेमवारी महापालिका प्रशासनाने आणखी पाच व्यावसायिकांविराेधात कारवाईचा बडगा उगारत त्यांच्या प्रतिष्ठानला कुलूप लावले.
मंगल कार्यालये, लॉन्स, हाॅटेल्सच्या इमारतींची उभारणी करताना अग्निशमन यंत्रणा, वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. यामुळे दुर्घटना घडल्यास जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी पाहता राष्ट्रीय हरित लवादाने यासंदर्भात आदेश जारी केला असून, निकषांची पूर्तता न करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानला सील लावण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारपासून मंगल कार्यालयांना कुलूप ठाेकण्याची माेहीम नगररचना विभाग, बाजार व परवाना, जलप्रदाय, अग्निशमन, आरोग्य विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्तरीत्या सुरू केली आहे. साेमवारी न्यू राधाकिशन प्लॉट येथील अमृतवाडी, संघवीवाडी, भाटियावाडी, अग्रसेन भवन आणि लक्कडगंज येथील कोहीनुर फंक्शन हॉल यांचा समावेश आहे. याचसोबत अमृतवाडी येथे अकोला मनपाच्या कोणतीही परवानगी न घेता नाशिक येथील खुशी टेक्स्टाईल यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या कपड्याचा सेलवर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बाजार, परवाना विभाग प्रमुख संजय खराटे, नगर रचना विभागाचे अभियंता राजेंद्र टापरे, अग्निशमन विभागाचे मनीष कथले, जलप्रदाय विभागाचे अभियंता अजिंक्य लांबे, आरोग्य विभागाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नितीन नागलकर, अतिक्रमण विभागाचे चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, दिनेश ठाकरे, गौरव श्रीवास, अतिक्रमण निर्मूलन सहायक सै. रफीक, रूपेश इंगळे, वैभव कवाडे, शोभा इंगळे आदींनी केली.