अकोला जिल्ह्यातील पाच नायब तहसीलदारांना पदोन्नती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 03:34 PM2019-09-15T15:34:05+5:302019-09-15T15:34:54+5:30
जिल्ह्यातील पाच नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात आली.
अकोला: अमरावती विभागातील २४ नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या महसूल व वन खात्यामार्फत १३ सप्टेंबर रोजी काढण्यात आला असून, त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पाच नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पाच नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात आली असून, रिक्त पदांवर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना अकोला येथे अन्न धान्य वितरण अधिकारी, बार्शीटाकळीचे नायब तहसीलदार यांना अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे तहसीलदार म्हणून पदस्थापना देण्यात आली. अकोट उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार एम.ए. माने यांना चिखलदरा येथे तहसीलदार म्हणून, मूर्तिजापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व्ही.आर. फरतारे यांना तिवसा येथे तहसीलदार म्हणून आणि अकोला तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्यामला खोत यांना बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात तीन नवे तहसीलदार!
तीन नायब तहसीलदारांची पदोन्नतीने अकोला जिल्ह्यात तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नायब तहसीलदार के.व्ही. गावंडे यांची अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात नझूल तहसीलदार म्हणून, एन.टी. लबडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात खरेदी अधिकारी म्हणून आणि बुलडाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदार एम.के.पागोरे यांची पदोन्नतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन तहसीलदारांची बदली!
गत ९ सप्टेंबर रोजीच्या शासन आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाचे तहसीलदार आशीष बिजवल यांची नागपूर येथे महानगरपालिका उपआयुक्त म्हणून आणि नझूल तहसीलदार मनोज लोणारकर यांची नागपूर येथे ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आशीष बिजवल यांची बदली झाल्याने रिक्त जागेवर मात्र अद्याप नवीन तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली नाही.