बदलीसाठी पाच पर्यायांमुळे पोलिसांच्या मनसुब्यावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:53 PM2020-07-20T12:53:16+5:302020-07-20T12:53:32+5:30
एकाच उपविभागात राहण्यासाठीचा खटाटोप करणाºया पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी यापूर्वी तीन ठिकाणचे पर्याय मागण्यात येत होते; मात्र आता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाच पर्यायी ठिकाणांचा फॉर्म्युला अवलंबविल्याचे समजते. एकाच उपविभागात राहण्यासाठीचा खटाटोप करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. एकाच उपविभागात तसेच एकाच ठाण्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांवर आता मर्जीचे ठिकाण सोडण्याची वेळ येणार असल्याचे संकेत आहेत.
अकोला पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून १५ टक्के बदल्या करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी या बदल्या करताना पोलीस कर्मचाऱ्यांना तीन पर्यायी ठिकाणे मागण्यात येत होती. त्यामुळे काही पोलीस कर्मचारी त्याच उपविभागात राहून त्यांना हवी तशा प्रकारची ड्युटी करीत होते; मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक गावकर यांनी पाच पर्याय मागविले होते. त्याचप्रमाणे आता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीसुद्धा पाच पर्यायी ठिकाणांचा फॉर्म्युला अवलंबल्याचे समजते. त्यामुळे अनेक वर्षांपासून ठाण मांडलेल्या तसेच संलग्नच्या नावे एकाच उपविभागात राहण्यासाठी प्रयत्न करणाºया पोलीस कर्मचाºयांचे मनसुबे उधळले जाणार असल्याची चर्चा आहे. या पाच पर्यायी कारणामुळे संबंधित कर्मचाºयाला उपविभागाच्या बाहेर ड्युटी करण्याचे काम पडणार असल्याचे निश्चित आहे. याच कारणामुळे अनेकांची आता पाचावर धारण बसली आहे. ही बदली प्रक्रिया शासनाच्या आदेशानंतर पूर्ण करण्यात येत असून, अकोला पोलीस दलातील ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत.
अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी तिथेच!
काही पोलीस अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील कर्मचारी हे त्यांना हव्या असलेल्या ठिकाणीच ड्युटी करीत असल्याचे वास्तव आहे.
काही अधिकाºयाच्या मर्जीतील कर्मचाºयांना त्यांच्याच अधीनस्त ठेवण्यासाठी ते अधिकारीच प्रयत्न करीत असल्याचे समजते.
त्यामुळे नवीन दमाचे तसेच प्रामाणिक असलेल्या पोलीस कर्मचाºयांना काम करण्याची संधी मिळत नसल्याचेही वास्तव आहे.
गोपनीय सेटिंग
बदल्यांसाठी काही जणांनी नेहमीप्रमाणे सेटिंग लावली आसल्याचे बोलले जात आहे; मात्र पोलीस बदली प्रक्रियेत पोलीस अधीक्षक यांनी स्वत: लक्ष केंद्रित केल्याने संबंधितांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असल्याचे समजते.
अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात काही कर्मचारी तब्बल सहा ते सात वर्षांपासून कार्यरत आहेत, तर हेच कर्मचारी यापूर्वी अकोट शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.