सहा पैकी पाच शाळा बंद, एक शिक्षक मद्यपान करून शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:56+5:302021-08-13T04:22:56+5:30
अकाेला : काेराेनाचा प्रभाव कमी हाेत असल्यामुळे शाळा पूर्ववत सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने काढलेला आदेश रद्द केलेला असला, ...
अकाेला : काेराेनाचा प्रभाव कमी हाेत असल्यामुळे शाळा पूर्ववत सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने काढलेला आदेश रद्द केलेला असला, तरी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत शिक्षण विभागाने नियाेजन केले आहे. ज्या ठिकाणी काेराेनाचे रुग्ण नाहीत, अशा ठिकाणी ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, शिक्षण विभागाचे हे नियाेजन सपशेल अपयशी ठरल्याचे गुरुवारी समाेर आले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग यांनी भेट दिलेल्या सहा शाळांपैकी पाच शाळा बंद आढळून आल्या, तर एका शाळेवर चक्क मद्यमान करून शिक्षक हजर असल्याचा गंभीर प्रकार समाेर आला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचे नियाेजन व तपासणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग या सहकाऱ्यांसह गुरुवारी दाैऱ्यावर हाेत्या. यादरम्यान त्यांनी शाळांचे नियाेजन व ऑनलाईन अभ्यासक्रमाची स्थिती याचा आढावा घेण्यासाठी काही शाळांना भेट देण्याचे ठरविले. त्यानुसार भेट दिलेल्या सहा पैकी पाच शाळा बंद आढळून आल्या. बाळापुरातील जि. प. शाळा इंदिरा नगर मराठी व उर्दू- दोन्ही शाळा बंद हाेत्या. तेथे एकही शिक्षक नाही. शाळेचा परिसर अस्वच्छ आढळून आलाच, साेबतच परिसरातील विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या काराभाराबाबत असंख्य तक्रारी केल्या.
जि. प. शाळा हिंगणा व बेलोरा बु. पातूर दोन्ही शाळा बंद, शिक्षक १२ वाजताच घरी परत. शाळेत घाणीचे साम्राज्य
जांभरूणच्या शाळेत मद्यपी शिक्षक
जि. प. शाळा जाभरूणचे शिक्षक खूप मद्यपान करून शाळेत उपस्थित असल्याचे शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आले. या शाळेच्या छतावर मजूर जेवण करून खरकटे शाळेच्या परिसरात फेकतात. मात्र, याचे भान मुख्याध्यापकांना नाही. शाळा प्राणी, पशु, मजुरांचे निवासस्थान झाले असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
बेलोरा खु. शाळेचे कॅशबुक मुख्याध्यापकाच्या घरी, शाळेतील शैक्षणिक साहित्य धूळ खात पडलेले, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान, मानव विकास मिशन अंतर्गत प्राप्त दूरदर्शन संच पडून काहीच उपयोग नाही, ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाचे काहीच नियोजन नसल्याचे समाेर आले.
जि. प. शाळा गोरेगाव शाळेत फक्त विद्यार्थी उपस्थित, मात्र शिक्षक घरी. शाळा रोज एक वाजता बंद. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन अपुरे असल्याच्या तक्रारी आहेत.
वेतन कपात अन् चाैकशी
बंद आढळून आलेल्या शाळेतील शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याच्या पगारात २० टक्के कपातीचे आदेश दिले असून, मद्यपान करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध चाैकशी करण्याचे आदेश दिले असून, चाैकशीअंती कठाेर कारवाई केली जाईल.
डाॅ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक