तीन ऑटोरिक्षांमधून गोमांसाची वाहतूक; पाच जणांना अटक, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
By नितिन गव्हाळे | Published: September 6, 2022 05:44 PM2022-09-06T17:44:38+5:302022-09-06T17:52:50+5:30
तीन ऑटोरिक्षांमध्ये गोमांस घेऊन जात असलेल्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अकोला: जनावरांची कत्तल करून त्यांचे प्रतिबंधित मांस तीन ऑटोरिक्षांमध्ये भरून अकोला शहराकडे आणत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यांनी सरकारी बगिचासमोर नाकाबंदी करून तीन ऑटोरिक्षा पकडून मोठी कारवाई केली आहे. या रिक्षांमधून ३ क्विंटल गोमांस जप्त केले असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
गोमांस घेऊन तीन ऑटोरिक्षा खदानकडून लक्झरी बस स्टॅन्ड मार्गे सिटी कोतवालीकडे येत असल्याचे कळताच विशेष पथकाने नाकाबंदी केली. अनिकट चौकाकडून एमएच ३० बीसी २९४८, एमएच ३० एए ६३७४ आणि एमएच ३० बीसी १७९३ क्रमांकाच्या तीन ऑटोरिक्षांना सरकारी बगिचाजवळ थांबविले. ऑटोंची तपासणी केल्यावर त्यामध्ये प्रतिबंधित गोमांस आढळून आले. पोलिसांनी ३ क्विंटल मांसासह तीनही ऑटोरिक्षा जप्त केले.
५ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, पोलिसांनी आरोपी ऑटोचालक शे. युनूस शे. मोहम्मद (३८ रा. महेमूद नगर अकोट फैल), इमरान अहमद शे. हयात (२४ रा. खिडकीपुरा अकोला), ऑटोचालक मो. सुफियान अ. सलिम (३२), मो. रूमान अ. सलिम (३२ रा. खिडकीपुरा), मो. इमरान मो. रफिक (२६ रा. कच्छी मशिदजवळ मो. अली रोड, अकोला) यांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी एकूण ५ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.