आंतरराष्ट्रीय शाळेच्या निवडीसाठी जिल्ह्यातील पाच शाळांचे बाह्यमूल्यांकन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:08 PM2019-02-06T13:08:13+5:302019-02-06T13:08:22+5:30
अकोला: शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले असून, या शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त करू इच्छिणाऱ्या जिल्हा परिषद, मनपा शाळांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते.
अकोला: शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले असून, या शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त करू इच्छिणाऱ्या जिल्हा परिषद, मनपा शाळांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १७ शाळांनी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळावी. यासाठी अर्ज केले. मंडळाने जिल्ह्यातील १७ पैकी पाच शाळा निश्चित केल्या आहेत. सध्या राज्यस्तरीय मूल्यांकन समितीच्या सहा सदस्यांकडून या शाळांचे बाह्यमूल्यांकन करण्यात येत आहे.
डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देत, तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक मिळावे, या दृष्टिकोनातून शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. या मंडळाची संलग्नता देऊन आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी मंडळाने आॅनलाइन अर्ज मागविले होते. यंदा जिल्ह्यातील दर्जेदार १७ जि.प. व मनपा शाळांनी आॅनलाइन अर्ज केले. यात जिल्ह्यातील पाच शाळांची मंडळाने निवड केली. गतवर्षीसुद्धा जिल्ह्यातील शाळांनी अर्ज केले होते; परंतु एकाही शाळेची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड होऊ शकली नाही. यंदा पाच शाळांची निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील एक किंवा दोन शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पाच शाळांच्या बाह्यमूल्यांकनासाठी राज्यस्तरीय शाळा मूल्यांकन समितीच्या सहा सदस्यांची चमू अकोल्यात आली आहे. ही चमू ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान दररोज एका शाळेची तपासणी करीत आहे. या चमूने तपासणी केल्यानंतर शाळांना गुण देण्यात येणार आहेत. सर्वाधिक गुण मिळविणाºया आणि निकष पूर्ण करणाºया शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची दुसºया टप्प्यात मुलाखत होईल. (प्रतिनिधी)
काय आहे आंतरराष्ट्रीय शाळा?
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध करून, भौतिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षक वर्ग उपलब्ध करून विद्यार्थ्यांसोबतच पालकांना या शाळांमधील शिक्षणासाठी परावृत्त करावे आणि खासगी व इंग्रजी कॉन्व्हेंट शाळांच्या तुलनेत दर्जेदार शिक्षण द्यावे, यासाठी शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले. या मंडळाची संलग्नता प्राप्त करणारी शाळा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ओळखली जाईल. या शाळेला शासनाकडून विशेष १0 कोटी रुपये अनुदान देण्यात येईल.
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने जिल्ह्यातील १७ पैकी ५ शाळा निश्चित केल्या. ही भूषणावह बाब आहे. दोन दिवसांपासून राज्यस्तरीय मूल्यांकन समितीचे सदस्य शाळांचे बाह्यमूल्यांकन करीत आहेत. आता बाह्यमूल्यांकनात कोणत्या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळते, हे महत्त्वाचे राहील. जिल्ह्यातील एक किंवा दोन शाळांना हा बहुमान मिळाला तर जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी राहील.
-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य
जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्था.