मुलीचा विनयभंग करणा-या पित्यास पाच वर्षांची शिक्षा
By admin | Published: April 22, 2017 01:21 AM2017-04-22T01:21:34+5:302017-04-22T01:21:34+5:30
पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सारकिन्हीतील घटना.
अकोला : पत्नीच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर या शिक्षेला आव्हान देऊन जामिनावर सुटलेल्या पित्याने स्वत:च्या १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीला दंड ठोठावण्यात आला आहे. पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सारकिन्ही येथील हा बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार आहे.
सारकिन्ही येथील रहिवासी इसमाने त्याच्या पत्नीला जिवंत जाळले होते. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने पतीला पत्नीच्या खूनप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान देत आरोपी पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. यावरून नागपूर खंडपीठाने या नराधमास जामीन मंजूर केला. सदर आरोपी जामिनावर सुटल्यानंतर थेट सारकिन्ही येथील घरी राहावयास आला. १५ ऑगस्ट २0१५ रोजी रात्री १५ वर्षीय मुलगी आणि तिचा भाऊ झोपलेले असताना मुलीचा बाप झोपेतून उठून मुलीजवळ झोपला आणि मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला; मात्र मुलीने आरडाओरड करताच तिचा भाऊ जागा होऊन त्याने शेजार्यांना बोलावले. शेजार्यांनी धाव घेऊन मुलीला बापाच्या तावडीतून सोडले.त्यानंतर यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाल्याने प्रकरण पोलिसांत आले नाही; मात्र आठव्या दिवशी मुलीने तक्रार दिल्यानंतर नराधम बापाविरुद्ध पिंजर पोलिसांनी विनयभंग आणि पॉस्को अँक्ट तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक डी. एन. फड यांनी केला. त्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी यामध्ये चार साक्षीदार तपासले. विनयभंग व पोटकलमासह पॉस्कोमध्ये आरोपी बापास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५00 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.
तसेच पॉस्को अँक्टच्या दुसर्या कलमान्वये पाच वर्षांची शिक्षा, हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, या तीनही शिक्षा आरोपीच्या जन्मठेपेची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला भोगाव्या लागणार आहेत.
आरोपीस जन्मठेपेचीही शिक्षा
पत्नीच्या खून प्रकरणात आरोपीस दोषी ठरवत त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेचीही शिक्षा सुनावली आहे; मात्र या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देऊन त्याने जामीन मिळविला आहे. आरोपी पिता हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यापासून मुलीच्या जीवाला धोका असल्याची माहिती आहे.
बापाचा आठ दिवस ठाण्यात मुक्काम
बापाने मुलीचा विनयभंग केल्यानंतर मुलगी तक्रार देण्यास तयार नव्हती, तसेच मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न झाला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाने मुलीवर प्रचंड दबाव आणल्याने ती तक्रार देण्यास घाबरत होती; मात्र पोलिसांनी तिला सुरक्षा पोहोचविण्यासह समजूत काढल्यानंतर मुलीने तक्रार दिली. या प्रक्रियेला तब्बल आठ दिवसांचा कालावधी लागला. त्या आठ दिवसांत आरोपी पित्यास पोलिसांनी ठाण्यातच बसवून ठेवले होते.