मुलीच्या विनयभंग प्रकरणात युवकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 20:01 IST2022-08-01T20:01:20+5:302022-08-01T20:01:34+5:30
Crime News : मुलगी घरी एकटी असताना आरोपी आकाश दशरथ मुठाळ(२३) याने घरात बळजबरीने शिरून मुलीचा विनयभंग केला.

मुलीच्या विनयभंग प्रकरणात युवकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास
अकोला : अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून एका २३ वर्षीय युवकास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हिडी पिंपळकर यांच्या न्यायालयाने दुपारी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच त्याचा सहकारी मित्र याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
अल्पवयीन मुलीने २७ जून २०१९ रोजी पातुर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मुलगी घरी एकटी असताना आरोपी आकाश दशरथ मुठाळ(२३) याने घरात बळजबरीने शिरून मुलीचा विनयभंग केला आणि तिला शारीरिक इजा पोहोचविली. यावेळी आकाश याला त्याचा मित्र सूरज वसंता इंगळे(२५) याने मदत करून त्याला प्रोत्साहन दिले. या प्रकरणात पातुर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३५४, ४५२, ४२७, ५०६ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सरकारतर्फे ८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. न्यायालयाने साक्ष व पुरावे ग्राह्य मानून आरोपी आकाश मुठाळ याला दोशी ठरवून पाच वर्षे फक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. तसेच त्याचा मित्र सूरज इंगळे याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. किरण खोत यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी केला होता. पोकॉ रत्नाकर बागडे व एएसआय प्रवीण पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.