पाच वर्षांपासून महिला व बाल कल्याणची योजना कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:51 PM2019-03-01T12:51:35+5:302019-03-01T12:51:42+5:30
अकोला: मागील पाच वर्षांपासून महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाची योजना राबविण्यात सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत.
अकोला: मागील पाच वर्षांपासून महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाची योजना राबविण्यात सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. २०१४ पासून ते आजपर्यंत तरतूद केलेल्या कोट्यवधींच्या निधीतून पात्र महिलांना शिलाई मशीन तसेच मनपाच्या शाळकरी मुलींना सायकलचे वाटप झाले नसल्याची माहिती आहे. संबंधित विभागावर खापर फोडून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणी शिवसेना व भारिप-बमसंने आक्षेप नोंदविला असला तरी विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक चुप्पी साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शहरातील गरजू महिलांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शिलाई मशीन तसेच महापालिकेच्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यासाठी मनपातील महिला व बाल कल्याण विभागामार्फत दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधीचा लाभ देण्यात सत्ताधारी भाजपाला मागील पाच वर्षांपासून अपयश आले आहे. २०१७ मध्ये महापालिकेत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या कालावधीत या विभागामार्फत राबवल्या जाणाºया योजनांचा पात्र व गरजू लाभार्थींना नक्की लाभ मिळेल, असा आशावाद निर्माण झाला होता. या ठिकाणी नेमके उलटे चित्र समोर आले आहे. महिलांना भेडसावणाºया समस्यांची जाण व अभ्यासू अशी ओळख असणाºया महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सारिका जयस्वाल यांना महिला व बाल कल्याण अधिकारी रंजना घुले यांना नोटशिट लिहिता येत नसल्याचा साक्षात्कार दोन वर्षांनंतर झाला. याप्रकरणी स्थायी समिती असो वा मनपाच्या मुख्य सभागृहात शिवसेना व भारिप-बमसंने सातत्याने आक्षेप नोंदविल्यानंतरही सत्ताधारी भाजपाने पात्र लाभार्थींना योजनांचा लाभ दिला नाही, हे येथे उल्लेखनीय.
कोट्यवधींच्या निधीचा वापरच नाही!
२०१३-१४- १ कोटी रुपये
२०१४-१५- २ कोटी
२०१५-१६- १ कोटी
२०१६-१७- १ कोटी ३० लक्ष
२०१७-१८- १ कोटी ५० लक्ष
२०१८-१९- २ कोटी ३६ लक्ष
२०१९-२०- ३ कोटी २५ लक्ष
आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
अर्थसंकल्पात दरवर्षी या विभागाकरिता कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. प्रशासनाने चालू आर्थिक वर्षासाठी ३ कोटी २५ लाखांची तरतूद केली आहे. या निधीचा गरजू लाभार्थींना लाभ मिळावा या प्रामाणिक उद्देशातून प्रशासनाकडून ठोस प्रयत्नांची गरज असून, महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस हतबल; राष्ट्रवादीची चुप्पी
शहरातील गरजू व पात्र महिलांना शिलाई मशीन व मनपाच्या शाळकरी मुलींना सायकल वाटप करण्यात अपयशी ठरलेल्या महिला व बाल कल्याण विभागासह सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्याची जबाबदारी अकोलेकरांनी विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर सोपवली आहे. विरोधी पक्षनेता साजिद खान व राष्ट्रवादीच्या गटनेत्या शीतल गायकवाड यांनी आजपर्यंत या विषयावर चकार शब्दही काढला नसल्याने मनपात विरोधी पक्ष कमालीचा हतबल असल्याचे चित्र समोर आले आहे.