नाल्याच्या पुराने शेती गेली खरडून; पिकाचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:36 PM2019-07-01T18:36:29+5:302019-07-01T18:36:34+5:30
हातरुण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे नाल्याच्या पुराने शेतात थैमान घातल्याने तीन एकर शेतातील अंकुरलेले पीके उद्धस्त झाले आहे.
हातरुण - हातरुण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे नाल्याच्या पुराने शेतात थैमान घातल्याने तीन एकर शेतातील अंकुरलेले पीके उद्धस्त झाले आहे. तीन एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खरडून गेलेल्या शेतात चिखल साचला असून मोठं मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ही शेती सध्या तरी पेरणी योग्य करता येत नाही.
हातरुण येथील शेतकरी इलियास खान ल्याकत खान यांच्या गट नंबर ४६५ मधील तीन एककर शेतातील अंकुरलेले पिक नाल्याच्या पुरात शनिवारी वाहून गेल्याने ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी इलियास खान यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या पावसामुळे नाल्याच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने या नाल्याकाठच्या शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. सुपीक जमीनीचा थर वाहून गेला आहे. खरडून गेलेल्या शेतात सध्या चिखल साचला असून शेतात कोणतेही काम करता येत नाही. सुपीक मातीचं झालेलं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. हातरुण ते कारंजा या मार्गावरील नाल्याच्या पुराने नाल्याकाठच्या शेतातील पिकाची हानी झाली आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकरी इलियास खान यांनी केली आहे.
आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. आणि पेरणी नंतर पीकही अंकुरले. मात्र उगवलेले शेतातील उडीद, मुंग, सोयाबीन, तुर, ज्वारी, कपाशीचे पीक पुर आल्याने खरडून गेल्याने शेतात काहीच राहिले नाही. काही शेताला तर तलावाचे स्वरूप पाहायला मिळाले. त्यामुळे एकरी हजारो रुपये खर्च केलेले पीक वाया गेले. पिकाचे नुकसान झालेले असताना नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी मुहूर्त कधी सापडतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नुकसानीचे सर्वेक्षण करा - गव्हाणकर
दमदार पाऊस झाल्याने नाल्याच्या पुराने पिकाची हानी झाली आहे. नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून मदत देण्याची मागणी बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी बाळापूर महसूल विभागाकडे केली आहे.