‘पूर्णे’ला पूर; घुंगशी बॅरेजचे सर्व गेट उघडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:41+5:302021-07-20T04:14:41+5:30
संजय उमक मूर्तिजापूर : पूर्णा नदीला आलेला पूर लक्षात घेऊन नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘घुंगशी बॅरेज’चे सर्व दरवाजे उघडण्यात ...
संजय उमक
मूर्तिजापूर : पूर्णा नदीला आलेला पूर लक्षात घेऊन नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘घुंगशी बॅरेज’चे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत पूर्णा दुथडी भरून वाहू लागली असून, नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
१७.४५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेले घुंगशी बॅरेज थोड्या पावसातच साठवण क्षमता ओलांडत असल्याने नदीला येणाऱ्या पुराचा ओघ पाहून पाण्याची साठवणूक करावी लागते. पूर्णा नदीला वारंवार येत असलेल्या पुरामुळे दि. १२ जूनपासून सर्वच १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यापूर्वी बॅरेजमध्ये ६०-६५ टक्के जलसाठा होता. आलेल्या पुरामुळे बॅरेज ९० टक्के जलसाठा झाल्याने यातील १ आणि १० नंबरचे गेट उघडावे लागले होते. पूर परिस्थिती पहाता दि. १२ जूनपासून सर्वच १० गेट उघडण्यात आले आहेत. २६३ मीटर पाणी संचय असलेल्या बॅरेजच्या पसाऱ्यानुसार घुंगशीपासून ते नेर, घामणा गावापर्यंत लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यात आतापर्यंत केवळ ३११.९ मिलीमीटर एवढे पर्जन्यमान झाले, तर सोमवारी २१.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी पूर्णा नदी ही भरभरून वाहत असल्याने संपूर्ण जलसाठा करणे शक्य नाही. (फोटो)
---------------------
दहाही गेटमधून होत आहे पाण्याचा विसर्ग
घुंगशी बॅरेज प्रकल्पात पहिल्याच पावसात ९० टक्के जलसाठा उपलब्ध होता. दरम्यान, इतरत्र भागात जोरदार पाऊस झाल्याने नदीला आलेल्या पुरामुळे क्षमतेपेक्षा जास्त जलसाठा झाल्याने गेट एक-एक करून उघडण्यात आले. घुंगशी बॅरेजमध्ये ५० टक्के जलसाठा झाल्याने १२ जून रोजी संपूर्ण १० गेट पूर्णपणे उघडण्यात आले. तेव्हापासून पावसाचा व पुराचा ओघ सारखा असल्याने संपूर्ण गेट उघडेच ठेवण्यात आले आहेत. यासंदर्भात नदी काठावरील गावांना व मच्छिमारी करणाऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचा व सतर्कता बाळगण्यासाठी सूचित केले आहे. यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना पूर्व माहिती दिली आहे. याबाबत सोशल मीडियावर ग्रुप तयार करण्यात आला असून, संबंधित पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत दहाही गेटमधून पाण्याचा विसर्ग होत आहे.
----------------------------------------
घुंगशी बॅरेजचे संपूर्ण दरवाजे १२ जून रोजी उघडण्यात आले आहेत. नदीला येणाऱ्या पुरामुळे बॅरेज ६० - ६५ टक्के भरल्याने सुरुवातीला दोन गेट उघडण्यात आले होते. आता संपूर्ण गेट उघडे असले तरी नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर येण्यापूर्वी दोन तास अगोदर सायरन वाजवून गावकऱ्यांना सतर्क करण्यात येते. भविष्यात नदीला येणारा पूर लक्षात घेता जलसाठा करण्यात येतो.
-संजय पाटील, उपविभागीय अभियंता, घुंगशी बॅरेज.