पूर्णेला पूर, जनजीवन विस्कळीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:26+5:302021-09-09T04:24:26+5:30
पूर्णेच्या पुलावरून २२ फूट पाणी: अकोला-अकोट, अकोट-शेगाव, तेल्हारा-वरवट-शेगाव मार्ग बंद अकोला: जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी पावसाचा जोर कायम असल्याने ...
पूर्णेच्या पुलावरून २२ फूट पाणी: अकोला-अकोट, अकोट-शेगाव, तेल्हारा-वरवट-शेगाव मार्ग बंद
अकोला: जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी पावसाचा जोर कायम असल्याने दुसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम होती. पूर्णेला पूर आल्याने जिल्ह्यातील तीन प्रमुख मार्ग बंद होते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर काही प्रवासी अडकून पडले होते. दरम्यान, गांधीग्राम येथे बुधवारी सकाळच्या सुमारास पूर्णेच्या पुलावरून तब्बल २२ फूट पाणी वाहत होते. सायंकाळपर्यंत पाणी ओसरले होते, मात्र वाहतूक पूर्णपणे बंद होती.
--------------------------------------------------अंदुरा: पुरामुळे ६० प्रवासी अडकले! अंदुरा: बाळापूर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे. अंदुरा येथील पूर्णा नदीच्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने अकोट-शेगाव मार्ग, तेल्हारा-अकोला मार्ग, तेल्हारा-बाळापूर मार्गावरील वाहतूक बंद होती. दरम्यान, या मार्गाने प्रवास करणारे ५० ते ६० प्रवासी अडकून पडले होते, तर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
--------
शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली !
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अंदुरा परिसरातील पूर्णा नदी, मोर्णा नदी, पानखास नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, या पुरामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. अगोदरच दुबार, तिबार पेरणी केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पूर परिस्थितीची पाहणी व सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
----------
ग्रामस्थांच्या सहकार्याने वीजपुरवठा सुरळीत
अंदुरा येथील पूर्णा, मोर्णा व पानखास नदीला आलेल्या पुरात विद्युत खांब उखडून पडले असल्याने अंदुरा येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. सरपंच पती गणेश बेंडे यांनी वायरमनशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या मदतीने विद्युत खांब उभा करून वीजपुरवठा सुरळीत केला. यावेळी गावातील भिकाजी वानखडे, गंगाधर आमझरे, गोपाल वराळे, महेश सांगोळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
------------------------
ग्रामस्थांचा पुढाकार; प्रवाशांची केली भोजनाची व्यवस्था
अंदुरा येथील नद्यांना पूर आल्याने आकोट - शेगाव, तेल्हारा - अकोला, तेल्हारा - बाळापूर मार्गे जाणारे प्रवासी ताटकळत उभे होते. अशा प्रवाशांची भोजन व्यवस्था हनुमान मंदिर परिसरात ज्ञानदेव ठोकणे, सुरेश कड, राजू गिर्हे आदी नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. या गावातील विश्वनाथ बदर्के, सोपान कड, विजय बावणे शंकर नवथळे, तुषार ताथूरकार, मांगुळकार, बोरवार आदी ग्रामस्थांनी मदत केली.